मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नद्या आणि धरणे तुडुंब भरली आहेत, रस्ते वाहतुकीसाठी अवरुद्ध झाले आहेत. अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत, शेतजमिनी नुकसानग्रस्त झाल्या आहेत. लोक सुरक्षित स्थळी हलवले जात आहेत आणि बचाव कार्य सुरू आहे. मराठवाड्यातील लोकांसाठी आता अभिनेते सयाजी शिंदेंनी मदतीचा हात पुढे केला आहे.
मराठवाड्यासाठी सयाजी शिंदेंची मदतीची घोषणा
मराठवाडा अतिवृष्टीमुळे बेहाल झाला आहे. मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालं आहे. पुरामुळे शेतातली सुपिक मातीही वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलंय. अशातच मराठवाड्याला पुन्हा ताठ मानेनं उभं करण्यासाठी अनेक हात सरसावले आहेत. अशातच आता मराठी अभिनेते सयाजी शिंदे यांनी मराठवाड्यासाठी मदतीचा हात देऊ केला आहे. त्यांच्या ‘सखाराम बाइंडर’ या नाटकाच्या 10 प्रयोगांचं मानधन ते महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत म्हणून देणार आहेत.

अभिनेते सयाजी शिंदे नेमके काय म्हणाले?
अभिनेते सयाजी शिंदे म्हणाले की, “मराठवाडा पावसावाचून मरत होता, आता तो पावसामुळे मरतोय, इतकी अवस्था वाईट आहे.” पुढे बोलताना ते म्हणाले की, “मला परत मी आयुष्यात नाटक करेन, असं वाटलं नव्हतं. पण तरी हे नाटक करायला घेतलं. हे नाटकं इतरं जिवंत, अनेक कालातीत आणि सुंदर आहे. सुंदर विचारांचं आहे. त्यामुळे हे नाटक करावं, असं मला वाटलं. दिल्लीत शुभारंभाचा हाऊसफुल्ल प्रयोग पार पडला. संपूर्ण महाराष्ट्रभर या नाटकाचे प्रयोग होतील. महाराष्ट्रात पूरपरिस्थिती खूप बिकट आहे. त्यामुळे या शुभारंभाच्या प्रयोगाचा नफा आम्ही पूरग्रस्तांना देणार आहोत. तसेच मी माझं पुढील 10 प्रयोगांचं मानधन पूरग्रस्तांना देणार आहे. या घोषणेमुळे सयाजी शिंदेंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.











