Shilpa Shetty : शिल्पा शेट्टी अडचणीत! 60 कोटींच्या फसवणूक प्रकरणात EOW कडून 5 तास चौकशी

हे प्रकरण ‘लोटस कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड’चे संचालक दीपक कोठारी यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर आधारित आहे

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, पण यावेळी कारण एखादा चित्रपट किंवा शो नसून, आर्थिक फसवणूक प्रकरण आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) शिल्पा शेट्टीची तब्बल पाच तास चौकशी केली आहे. ही चौकशी एका व्यावसायिकाकडून झालेल्या सुमारे ₹६० कोटींच्या फसवणुकीच्या प्रकरणात झाली. या प्रकरणात शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांच्यासह पाच जणांचे जबाब आधीच नोंदवण्यात आले आहेत. मात्र शिल्पा किंवा राज कुंद्रा थेट या प्रकरणात सामील आहेत का, याबाबत अजून ठोस माहिती समोर आलेली नाही.

काय आहे प्रकरण?

हे प्रकरण ‘लोटस कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड’चे संचालक दीपक कोठारी यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर आधारित आहे. कोठारी यांनी आरोप केला आहे की, २०१५ ते २०२३ दरम्यान शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी व्यापार विस्ताराच्या नावाखाली त्यांची ₹६० कोटींपेक्षा अधिक रक्कम फसवली. तक्रारदाराच्या मते, सुरुवातीला ₹७५ कोटींची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर गुंतवणूक म्हणून रक्कम स्वीकारण्यात आली आणि त्यावर मासिक परतावा तसेच मूळ रकमेची परतफेड करण्याचे आश्वासन देण्यात आले.

गुंतवणूक झाली पण परतावा नाही

कोठारी यांच्या म्हणण्यानुसार, एप्रिल २०१५ मध्ये त्यांनी एक ‘शेअर सदस्यता करार’ करून ₹३१.९५ कोटी, आणि सप्टेंबर २०१५ मध्ये एक पूरक करार करून ₹२८.५३ कोटी ट्रान्सफर केले. म्हणजेच एकूण सुमारे ₹६०.४८ कोटींची गुंतवणूक त्यांनी केली. मात्र, अनेक वर्षांनंतरही परतावा मिळाला नाही आणि वारंवार मागणी करूनही रक्कम परत मिळाली नाही. अखेर त्यांनी पोलिसांत फसवणुकीची तक्रार दाखल केली.

कायदेशीर पावले

ऑगस्ट २०२५ मध्ये या प्रकरणी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर सप्टेंबर २०२५ मध्ये दोघांवर लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली, जेणेकरून ते देशाबाहेर जाऊ न शकतील. आर्थिक गुन्हे शाखा याप्रकरणी सखोल तपास करत आहे.

शिल्पा शेट्टीकडून आरोप फेटाळले (Shilpa Shetty) 

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचे वकील प्रशांत पाटील यांनी सर्व आरोप फेटाळून लावत, हे सर्व बिनबुडाचे असल्याचे सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, आम्ही तपास यंत्रणांशी पूर्ण सहकार्य करत असून आमचा पक्ष पारदर्शकपणे मांडणार आहोत.आर्थिक गुन्हे शाखेचा तपास सध्या सुरू असून आणखी काही व्यक्तींना चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांची या प्रकरणातील भूमिका स्पष्ट होते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. फिल्मी दुनियेतील या चर्चित जोडप्याच्या विरोधातील ही मोठी आर्थिक फसवणूक प्रकरण असल्याने याकडे केवळ मनोरंजन नाही तर कायद्याच्या दृष्टिकोनातूनही गांभीर्याने पाहिले जात आहे.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News