२९ वर्षीय रश्मिका मंदानावर ५१ वर्षीय मलायका अरोराची उपस्थिती जड ठरत आहे. बॉलिवूडमधील बहुप्रतीक्षित “थामा” या चित्रपटातील नवीन गाणं “पॉइझन बेबी” सध्या सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. या गाण्यात मलायका अरोराचे दमदार ठुमके प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. रश्मिका मंदाना देखील गाण्यात आहे, मात्र मलायकाच्या एन्ट्रीनं आणि तिच्या डान्स स्टाईलनं तिनं संपूर्ण लाइमलाइट चोरली आहे. या गाण्याला अवघ्या १३ तासांत यूट्यूबवर ३९ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि चाहते गाण्याचे भरभरून कौतुक करत आहेत.
गाण्याची सुरुवात मलायकाच्या डान्सने
“पॉइझन बेबी” या गाण्यात मलायका अरोरासोबत आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसत आहेत. हे गाणं जैस्मीन सैंडलस, सचिन-जिगर आणि दिव्या कुमार यांनी गायले आहे. गाण्याची सुरुवात मलायकाच्या डान्सने होते. त्यानंतर आयुष्मान खुरानाचा प्रवेश होतो आणि शेवटी रश्मिका मंदानाची एंट्री होते. मलायकाचा ग्लॅमरस लूक आणि एनर्जीने तिने पुन्हा एकदा प्रेक्षकांना घायाळ केलं आहे.

यापूर्वी “थामा” चित्रपटातील एक गाणं नोरा फतेहीवर चित्रीत करण्यात आलं होतं. हे गाणं रश्मीत कौर आणि जिगर सरैयाने गायले असून गीतकार अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले आहे. संगीत सचिन-जिगर यांनी दिले आहे. गाणं प्रदर्शित होताच अवघ्या १० मिनिटांत त्याला १२ लाख व्ह्यूज मिळाले. नोरा फतेहीने तिच्या इंस्टाग्रामवर हे यश साजरं करताना चाहत्यांचे आभार मानले आणि त्यांच्या प्रेमाने ती भारावून गेल्याचं सांगितलं.
कसा आहे थामा चित्रपट
“थामा” हा चित्रपट एक रोमँटिक-कॉमेडी हॉरर फिल्म असून तो ‘मैडॉक हॉरर कॉमेडी युनिव्हर्स’चा पाचवा भाग आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केले आहे. पटकथा नीरेन भट्ट, सुरेश मॅथ्यू आणि अरुण फलारा यांनी लिहिली आहे. या चित्रपटात आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदाना पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसतील. त्यांच्यासोबत नवाजुद्दीन सिद्दीकी आणि परेश रावल यांच्यासारखे दिग्गज कलाकारही प्रमुख भूमिकेत झळकतील.
“थामा” ही एका अनोख्या वॅम्पायर प्रेमकथेवर आधारित आहे. चित्रपटात आयुष्मान खुरानाचा पात्र रश्मिकाशी भेटल्यानंतर वॅम्पायरमध्ये रूपांतरित होतो आणि त्याला अलौकिक शक्ती प्राप्त होतात. हा चित्रपट २१ ऑक्टोबर रोजी, दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.











