परवानगीशिवाय वापरता येणार नाही ऋतिक रोशनचा फोटो किंवा आवाज; उच्च न्यायालयाचे आदेश

कोणतीही कंपनी किंवा व्यक्ती त्यांच्या नावाचा, फोटोचा किंवा आवाजाचा परवानगीशिवाय वापर करून उत्पादने विकू शकणार नाहीत किंवा जाहिरात करू शकणार नाहीत.

बॉलिवूड सुपरस्टार ऋतिक रोशन यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने त्यांच्या ‘व्यक्तिमत्त्व अधिकारां’च्या संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. या निर्णयामुळे कोणतीही कंपनी किंवा व्यक्ती त्यांच्या नावाचा, फोटोचा किंवा आवाजाचा परवानगीशिवाय वापर करून उत्पादने विकू शकणार नाहीत किंवा जाहिरात करू शकणार नाहीत.

ऋतिक रोशन यांनी न्यायालयात तक्रार दाखल करताना म्हटले होते की, अनेक ई-कॉमर्स वेबसाइट्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर त्यांचे नाव, फोटो, व्हिडिओ आणि आवाज यांचा वापर उत्पादने विकण्यासाठी आणि डान्स ट्युटोरियल्समध्ये केला जात आहे. यामुळे त्यांच्या प्रतिमेचा गैरवापर होत आहे आणि जनतेला दिशाभूल होण्याची शक्यता आहे.

न्यायालयाचे स्पष्ट आदेश

दिल्ली उच्च न्यायालयाने ई-कॉमर्स आणि इंटरनेट प्लॅटफॉर्म्सना आदेश दिले आहेत की त्यांनी अशा सर्व लिंक्स आणि लिस्टिंग तात्काळ हटवाव्यात. तसेच, कोणताही व्यक्ती वा संस्था ऋतिक रोशन यांच्या नावाचा, आवाजाचा किंवा छायाचित्राचा वापर व्यावसायिक कारणासाठी करत असल्याचे आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.

शैक्षणिक वापरास परवानगी

न्यायालयाने स्पष्ट केले आहे की शैक्षणिक उद्देशाने, जसे की डान्स शिकवण्यासाठी ऋतिक रोशन यांच्या गाण्यांचा वापर करण्यात आल्यास, त्याला ‘व्यावसायिक शोषण’ समजले जाणार नाही. “हा एक गाण्याचा वापर आहे जो लोक नृत्य शिकवण्यासाठी करत आहेत, त्यामुळे तो व्यावसायिक उत्पादन म्हणून गणला जाऊ शकत नाही,” असे न्यायालयाने नमूद केले.

फॅन क्लब्सना इशारा

न्यायालयाने ऋतिक रोशनच्या नावाने चालवण्यात येणाऱ्या फॅन क्लब्स आणि इंस्टाग्राम पेजेसलाही सूचित केले आहे की जर त्यावरून कोणताही व्यावसायिक फायदा घेतला जात असेल, तर त्यांच्यावरही कारवाई होऊ शकते. मात्र, एकतर्फी आदेश देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.

ऋतिक रोशन याआधीही अनेक बॉलिवूड कलाकारांनी व्यक्तिमत्व हक्कांच्या संरक्षणासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. यात अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन, करण जोहर, ऋषभ शेट्टी आणि अक्किनेनी नागार्जुन यांचा समावेश आहे. हा निर्णय केवळ सेलिब्रिटींसाठीच नाही, तर सामान्य नागरिकांच्या डिजिटल अधिकारांसंदर्भातही एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News