Satish Shah Death : लोकप्रिय विनोदी तारा हरपला! अभिनेते सतीश शाह यांचे निधन

सतीश शाह हे केवळ एक विनोदी अभिनेता नव्हते, तर त्यांनी गंभीर भूमिकांमध्येही आपले कौशल्य दाखवले. त्यांच्या अभिनयातून जीवनातील वास्तव आणि विनोद यांचा सुंदर संगम दिसत असे

साराभाई व्हर्सेस साराभाई’ या लोकप्रिय टीव्ही मालिकेतून घराघरात पोहोचलेले ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचे निधन (Satish Shah Death) झाले आहे. वयाच्या ७४व्या वर्षी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने हिंदी चित्रपटसृष्टी आणि दूरदर्शन क्षेत्रात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सतीश शाह गेल्या काही काळापासून मूत्रपिंडाशी संबंधित गंभीर आजाराने त्रस्त होते. शनिवारी त्यांची तब्येत अचानक बिघडली आणि त्यांना दादरच्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. किडनी फेल्युअरमुळे त्यांचे प्राण गेले, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

अशोक पंडित यांनी दिली माहिती –  Satish Shah Death

या दुर्दैवी घटनेची माहिती चित्रपट निर्माते आणि इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशन (IFTDA) चे अध्यक्ष अशोक पंडित यांनी केली आहे. त्यांनी दुःख व्यक्त करत सांगितले की, “सतीश शाह आता आपल्या सोबत नाहीत. ते माझे अतिशय जवळचे मित्र होते. किडनी फेल्युअरमुळे त्यांचे निधन झाले. अचानक त्यांना त्रास होऊ लागला आणि त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना वाचवू शकले नाही.

सतीश शाह यांचा मृतदेह मुंबईतील बांद्र्याच्या कलानगर येथील त्यांच्या घरी आणण्यात येणार आहे. त्यांच्या अंत्यसंस्काराची प्रक्रिया रविवार, म्हणजेच २६ ऑक्टोबर रोजी पार पडेल. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण मनोरंजनसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे. अनेक कलाकार आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. (Satish Shah Death)

सतीश शाह चित्रपट सृष्टीतील मोठं नाव

सतीश शाह हे भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन जगतातील एक प्रतिष्ठित नाव होते. त्यांनी आपल्या विनोदी अभिनयाने, उत्कृष्ट संवादफेकीने आणि सहज अभिनय शैलीने प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले. त्यांचा जन्म २५ जून १९५१ रोजी मुंबईत झाला. त्यांनी सेंट झेवियर कॉलेज, मुंबई येथून शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) मधून अभिनयाचे प्रशिक्षण घेतले.

त्यांनी १९७० च्या दशकात आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. सुरुवातीला काही छोट्या भूमिका केल्यानंतर त्यांच्या अभिनयाकडे चित्रपटसृष्टीचे लक्ष गेले. मात्र त्यांना खरी लोकप्रियता मिळाली ती दूरदर्शनवरील ‘ये जो है जिंदगी’ या मालिकेमुळे. या मालिकेत त्यांनी प्रत्येक भागात वेगवेगळे पात्र साकारून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. त्यांच्या या बहुआयामी अभिनयामुळे ते घराघरात ओळखले जाऊ लागले.

सतीश शाह यांनी आपल्या चार दशकांच्या कारकिर्दीत २५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी अनेक लोकप्रिय चित्रपटांत संस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. ‘मैंने प्यार किया’, ‘हम आपके हैं कौन’, ‘कल हो ना हो’, ‘ओम शांती ओम’, ‘सत्यमेव जयते’, ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’ आणि ‘कभी हां कभी ना’ हे त्यांचे काही उल्लेखनीय चित्रपट आहेत. ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ या मालिकेतील इंद्रवदन साराभाई हे त्यांचे पात्र आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. या भूमिकेद्वारे त्यांनी एका टिपिकल मध्यमवर्गीय पण विनोदी स्वभावाच्या वडिलांची भूमिका इतक्या प्रभावीपणे साकारली की ते घराघरातील परिचित नाव बनले. त्यांच्या संवादांतील विनोदबुद्धी आणि अभिनयातील सहजता यामुळे ही मालिका आजही चाहत्यांची आवडती आहे.

सतीश शाह हे केवळ एक विनोदी अभिनेता नव्हते, तर त्यांनी गंभीर भूमिकांमध्येही आपले कौशल्य दाखवले. त्यांच्या अभिनयातून जीवनातील वास्तव आणि विनोद यांचा सुंदर संगम दिसत असे. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक पिढ्यांना हसवले आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणले. त्यांच्या निधनाने भारतीय मनोरंजन क्षेत्राने एक प्रतिभावान, विनोदी आणि लोकाभिमुख कलाकार गमावला आहे. त्यांची उणीव चाहत्यांना आणि सहकाऱ्यांना नेहमीच जाणवेल. सतीश शाह यांचे योगदान भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात कायमस्वरूपी कोरले जाईल.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News