आयुष्मान खुरानाने ‘थामा’च्या सेटवर नवाजुद्दीन सिद्दीकीची मागितली माफी; शूटिंगदरम्यान घडलेली मजेशीर घटना चर्चेत

शूटिंगदरम्यान आयुष्मानने मला एकदा खरंच ठोसा मारला आणि माझा बनावटी दात तुटला. पण त्यानंतर त्याने अनेक वेळा माफी मागितली. एवढंच नव्हे, तर त्याने माझ्या घरी फुलांचे गुच्छ पाठवले.

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांची प्रमुख भूमिका असलेला ‘थामा’ हा चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. 21 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने काहीच दिवसांत तब्बल ₹100 कोटींची कमाई केली आहे. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित आणि मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली तयार झालेला हा चित्रपट कंपनीच्या हॉरर युनिव्हर्स मालिकेतील पाचवा भाग असून, यापूर्वी ‘स्त्री’, ‘स्त्री 2’, ‘भेड़िया’ आणि ‘मुंज्या’ या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर मोठं यश मिळवलं होतं.

‘थामा’मध्ये आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदाना यांची ताजी जोडी झळकते, तर नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी खलनायकाची दमदार भूमिका साकारली आहे. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून विशेष दाद मिळत आहे. चित्रपटात वरुण धवन चा देखील छोटासा पण लक्षवेधी ‘भेड़िया’ या त्याच्या जुन्या भूमिकेतील कॅमिओ आहे, जो प्रेक्षकांसाठी एक सरप्राइज ठरला आहे.

आयुष्मानने शेअर केल्या खास आठवणी

चित्रपटाच्या यशानंतर आयुष्मान आणि नवाजुद्दीन यांनी आयएएनएसशी संवाद साधला. या मुलाखतीदरम्यान दोघांनी शूटिंगदरम्यानच्या काही आठवणी शेअर केल्या. नवाजुद्दीन यांनी यावेळी एक मजेशीर प्रसंग सांगितला, ज्यामुळे संपूर्ण वातावरणात हशा पिकला. ते म्हणाले, “शूटिंगदरम्यान आयुष्मानने मला एकदा खरंच ठोसा मारला आणि माझा बनावटी दात तुटला. पण त्यानंतर त्याने अनेक वेळा माफी मागितली. एवढंच नव्हे, तर त्याने माझ्या घरी फुलांचे गुच्छ पाठवले. कदाचित इतकी फुलं त्याने आपल्या पत्नीला सुद्धा पाठवली नसतील!”

त्यावर आयुष्मान खुराना हसत म्हणाले, “हो, हे खरं आहे. मी नवाज भाईंची हजार वेळा माफी मागितली होती. ती पूर्णपणे अपघाती घटना होती. आम्ही त्या सीनमध्ये इतके गुंतलो होतो की तो क्षण जरा जास्तच वास्तववादी झाला.” त्यांनी पुढे सांगितले, “नवाज भाईंसोबत काम करणं हा माझ्यासाठी एक अद्भुत अनुभव होता. त्यांच्या अभिनयशैलीतून खूप काही शिकायला मिळालं. शूटिंगचं वातावरण अतिशय सहज, आपुलकीचं आणि मजेशीर होतं. त्यामुळे चित्रपटातील दृश्यांना नैसर्गिकता मिळाली.”

नवाजुद्दीन सिद्दीकी यांनीदेखील आयुष्मानच्या व्यावसायिक दृष्टिकोनाचं कौतुक केलं. ते म्हणाले, “त्या छोट्या अपघातानंतर त्याने ज्या पद्धतीने माफी मागितली आणि ज्या आपुलकीने तो वागला, त्यामुळे आमचं नातं अजून घट्ट झालं. सेटवर एकमेकांशी असलेली समज आणि मैत्रीच या चित्रपटाच्या यशामागचं खरं कारण आहे.”

थामा ची बंपर कमाई

पहिल्याच दिवशी ‘थामा’ने ₹25 कोटींपेक्षा अधिक कमाई केली होती. चित्रपटात कॉमेडी, रोमँस, हॉरर आणि थ्रिलरचा सुंदर मिलाफ दिसतो. कथानक अनोखं असून, त्यातील अभिनय आणि दिग्दर्शन दोन्ही प्रेक्षकांना भावले आहेत. आज ‘थामा’ केवळ बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरलेला नाही, तर आयुष्मान आणि नवाजुद्दीनमधील ही मैत्रीपूर्ण आणि मजेशीर घटना चाहत्यांच्या चर्चेचा विषय बनली आहे.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News