हिंदी चित्रपटसृष्टीतील दोन अनुभवी आणि प्रेक्षकप्रिय कलाकार पुन्हा एकत्र मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. ‘वध’ या मनाला भिडणाऱ्या चित्रपटातून प्रेक्षकांची मनं जिंकणारे संजय मिश्रा आणि नीना गुप्ता आता ‘वध 2’ घेऊन (Vadh 2 Release Date) परत येत आहेत. प्रेक्षकांच्या भावनांना स्पर्श करणाऱ्या कथानकाची ही पुढची कडी असल्याचं निर्मात्यांनी सांगितलं असून, चित्रपटाची रिलीज डेट अखेर जाहीर करण्यात आली आहे. ‘वध 2’ हा चित्रपट येत्या 6 फेब्रुवारी 2026 रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
‘वध 2’ हा जसपाल सिंग संधू यांनी लिहिला आणि दिग्दर्शित केला आहे. पहिल्या भागाने ज्या वास्तववादी भावनांना आणि नैतिक प्रश्नांना स्पर्श केला होता, त्याच प्रवाहाला पुढे नेत ‘वध 2’ ही कथा अधिक गहन पद्धतीने मांडली गेली आहे. मानवी जीवनातील गुंतागुंती, अंतर्गत संघर्ष, आणि भावनिक दुविधा यांवर आधारित ही कथा प्रेक्षकांना पुन्हा विचार करायला लावेल, असं चित्रपटाच्या टीमचं म्हणणं आहे.

दिग्दर्शक काय म्हणाले? Vadh 2 Release Date
दिग्दर्शक जसपाल सिंग संधू यांनी या चित्रपटाबद्दल सांगताना म्हटलं, “आम्ही ‘वध 2’ चं जग खूप मनापासून तयार केलं आहे. पहिल्या चित्रपटानं जसं लोकांच्या भावनांना हात घातला, तसं काहीतरी अधिक खोल आणि प्रभावी या चित्रपटात आहे. यात नवीन पात्रं, वेगळी परिस्थिती आणि जीवनाशी झुंजणाऱ्या माणसांच्या भावनिक प्रवासाची कथा दिसेल. ‘वध 2’ म्हणजे पहिल्या भागाचं नैसर्गिक पण अधिक तीव्र रूप आहे.”
पोस्टर प्रदर्शित –
चित्रपटाच्या घोषणेसोबतच निर्मात्यांनी संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांच्या पहिल्या लूकचा पोस्टरही प्रदर्शित केला आहे. या पोस्टरमध्ये दोघांच्या चेहऱ्यावर दिसणारी गंभीरता आणि भावनिक खोली पाहून चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. पोस्टरवरूनच चित्रपटाचा टोन गंभीर, विचारप्रवर्तक आणि वास्तवाशी घट्ट जोडलेला असल्याची झलक दिसते.
निर्माते लव रंजन यांनी ‘वध 2’ विषयी बोलताना सांगितलं, “‘वध’ हा एक वेगळ्या धाटणीचा सिनेमा होता, कारण त्याने समाजातील साध्या लोकांच्या आयुष्यातील संघर्ष अत्यंत वास्तवतेने दाखवले. या चित्रपटाची ताकद त्याच्या प्रामाणिकपणात होती. ‘वध 2’ मध्ये जसपाल यांनी त्याच विचारांना अधिक खोली दिली आहे. हा सिनेमा केवळ मनोरंजनासाठी नाही, तर तो माणसाच्या मनात असलेल्या नैतिक प्रश्नांना जागं करतो. आम्हाला आनंद आहे की प्रेक्षकांना ही कथा 6 फेब्रुवारीपासून मोठ्या पडद्यावर अनुभवता येईल.
‘वध 2’ हा लव फिल्म्सच्या बॅनरखाली निर्मित होत असून, त्याचे निर्माते लव रंजन आणि अंकुर गर्ग आहेत. संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांची जोडी पुन्हा एकदा एका सशक्त आणि विचारांना चालना देणाऱ्या भूमिकेत दिसणार आहे. ‘वध’ प्रमाणेच ‘वध 2’ देखील वास्तवाशी भिडणारी, हृदयस्पर्शी आणि प्रेक्षकांना अंतर्मुख करणारी कथा सांगेल, असा विश्वास चित्रपटाच्या टीमने व्यक्त केला आहे. या चित्रपटाची पहिली झलकच चाहत्यांमध्ये उत्सुकतेची लाट निर्माण करत आहे. आता सगळ्यांची नजर 6 फेब्रुवारी 2026 या तारखेकडे लागली आहे, जेव्हा ‘वध 2’ मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या मनावर पुन्हा एकदा राज्य करायला सज्ज होईल.











