बॉलिवूड आणि साउथ चित्रपटसृष्टीत कामाच्या तासांवरून सुरू असलेल्या चर्चेवर आता अभिनेत्री रश्मिका मंदाना हिनेही भाष्य केलं आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री दीपिका पदुकोणने इंडस्ट्रीतील दीर्घ कामाचे तास आणि असमान वागणुकीबाबत स्पष्ट मत मांडले होते. दीपिकाच्या या वक्तव्यानंतर अनेक कलाकारांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आणि आता रश्मिकानेही आपली ठाम भूमिका मांडली आहे.
काय म्हणाली रश्मिका
आपल्या आगामी चित्रपट ‘द गर्लफ्रेंड’च्या प्रमोशनदरम्यान रश्मिकाने माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, ती अनेकदा सलग 12 ते 14 तास काम करते आणि त्यामुळे शारीरिक व मानसिक थकवा येतो. तिच्या मते, कलाकारांनी आणि इंडस्ट्रीतील सर्वांनी आपल्या कामाच्या वेळेबाबत स्पष्ट सीमा आखायला हव्यात. रश्मिका म्हणाली, “मी खूप जास्त काम करते आणि मला आता वाटतं की हे योग्य नाही. प्रत्येकाने स्वतःसाठी एक मर्यादित वेळ ठरवायला हवा. 8 तास, 9 तास किंवा 10 तास काम करा, पण त्यानंतर स्वतःला वेळ द्या. आपल्याला 9 ते 6 अशा वेळापत्रकाची गरज आहे. त्यामुळे कलाकार, तंत्रज्ञ आणि इतर कामगार यांचं वैयक्तिक जीवन आणि व्यावसायिक जीवन यामध्ये समतोल राखता येईल.”

रश्मिकाने पुढे सांगितले की, चित्रपट हे फक्त कलाकारांवर अवलंबून नसतात. मेकअप आर्टिस्ट, तंत्रज्ञ, लाईटमन, ड्रायव्हर्स, कॉस्ट्यूम डिझायनर्स अशा अनेक लोकांच्या मेहनतीवर संपूर्ण प्रोजेक्ट उभा राहतो. त्यामुळे कामाचे ठराविक तास असणे गरजेचे आहे. ती म्हणाली, “आपण फक्त स्टार्सबद्दल बोलू नये. आपल्या टीममधल्या प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याचा आणि मानसिक समाधानाचा विचार करायला हवा. कामाचा ताण आणि लांब तासांमुळे अनेकांना त्रास होतो, पण ते कोणालाच सांगता येत नाही. म्हणून इंडस्ट्रीत एक समतोल शेड्यूल लागू केलं गेलं पाहिजे.”
चाहत्यांनी केलं कौतुक
रश्मिकाच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी तिच्या विचारांचे कौतुक केले आहे. काहींनी म्हटले आहे की हे बदल खरोखर अमलात आणले गेले, तर इंडस्ट्रीतील वातावरण अधिक निरोगी होईल. दीपिकाने मांडलेला मुद्दा आणि रश्मिकाने केलेली पाठराखण यामुळे आता कामाच्या तासांवरील वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, रश्मिका मंदाना सध्या ‘द गर्लफ्रेंड’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून लवकरच ती एका मोठ्या हिंदी प्रोजेक्टमध्येही दिसणार आहे. तिच्या ‘थामा’ या चित्रपटाचीही चर्चा अलीकडेच रंगली होती. तिच्या या स्पष्ट मतामुळे इंडस्ट्रीत वर्क-लाइफ बॅलन्सबाबतची चर्चा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आली आहे.











