Ranbir Kapoor : लग्नसमारंभात पैसे घेऊन नाचणाऱ्या स्टार्सवर रणबीर कपूरची स्पष्ट भूमिका; म्हणाला…

अनेक कलाकार पैसे मिळवण्यासाठी अशा खासगी कार्यक्रमांत नाचतात, त्यात काही चुकीचे नाही, असेही त्याने नमूद केले.

Ranbir Kapoor : बॉलिवूडमध्ये अनेक सितारे उद्योगपती, सेलिब्रिटी किंवा मोठ्या घराण्यांच्या लग्नसोहळ्यांमध्ये परफॉर्म करून भरघोस मानधन कमावतात. काही जण स्टेज होस्टिंग करतात, तर काही खास परफॉर्मन्स देतात. अशा कार्यक्रमांसाठी निर्माते-कलाकारांना मोठी रक्कम देण्याची परंपराच झाली आहे. मात्र या चमकदार दुनियेपासून थोडा वेगळा मार्ग स्वीकारणारा अभिनेता म्हणजे रणबीर कपूर. त्याने स्पष्ट केले आहे की पैसे कितीही मिळाले तरी तो कधीही कोणाच्या लग्नात नाचण्यासाठी तयार होणार नाही.

काही चुकीचे नाही (Ranbir Kapoor)

रणबीरने ‘टाइम्स नाऊ’ला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत या निर्णयामागील कारण मोकळेपणाने सांगितले होते. त्याच्या म्हणण्यानुसार, तो ज्या घरात वाढला आहे, त्या घरातील मूल्यं त्याला अशा प्रकारच्या कार्यक्रमांपासून दूर राहण्याची शिकवण देतात. अनेक कलाकार पैसे मिळवण्यासाठी अशा खासगी कार्यक्रमांत नाचतात, त्यात काही चुकीचे नाही, असेही त्याने नमूद केले. मात्र, या गोष्टी त्याच्या व्यक्तिमत्त्वाशी आणि कुटुंबाच्या परंपरांशी जुळत नाहीत.

पैसा हा कधीच उद्देश नव्हता

रणबीरने (Ranbir Kapoor) पुढे सांगितले होते की, पैसा हा त्याचा कधीच उद्देश नव्हता. तो म्हणाला की, अब्जावधी कमावण्याची त्याला हौस नाही. तो स्वतःला सर्वप्रथम एक अभिनेता म्हणून पाहतो आणि अभिनयाच्या माध्यमातून लोकांच्या मनात स्थान मिळवणे हेच त्याचे खरे ध्येय आहे. लग्नातील वातावरण, तिथे दारूचे ग्लास घेऊन उभे असलेले पाहुणे आणि त्यातून मिळणाऱ्या प्रतिक्रिया यामुळे कलाकाराची प्रतिष्ठा कमी होऊ शकते, असे त्याचे मत आहे. म्हणूनच तो असा कोणताही परफॉर्मन्स करण्यास नकार देतो.

या मुलाखतीत रणबीरने स्टारडमबद्दलही आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्याच्या मते, स्टारडम टिकवण्यासाठी स्वतःच्या मूल्यांशी तडजोड करणे चुकीचे आहे. तो म्हणाला की स्टार असल्याचा फायदा घेत काहीही करण्याचा किंवा त्यातून सुटण्याचा तो प्रयत्न करणार नाही. कोणत्याही परिस्थितीत त्याला मनाविरुद्ध काही करण्यासाठी भाग पाडता येणार नाही.

रणबीर कपूरचे हे वक्तव्य आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाले असून चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा रंगत आहे. अनेकांनी त्याच्या विचारांचे कौतुक केले असून, बॉलिवूडमध्ये अशा स्पष्ट भूमिकेची गरज असल्याचे मतही व्यक्त केले आहे.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News