गुजरात हा भारतातील भूकंप प्रवण प्रदेशांपैकी एक मानला जातो, विशेषतः कच्छ, सौराष्ट्र हा भाग अत्यंत संवेदनशील आहे. कच्छ प्रदेशातील भूगर्भीय रचना, फॉल्ट लाईन्स आणि टेक्टॉनिक प्लेट्सची हालचाल यामुळे येथे भूकंपाची शक्यता कायम असते. 2001 मधील भुज भूकंप हा गुजरातच्या भूकंपीय इतिहासातील सर्वात विनाशकारी भूकंपांपैकी एक होता. कच्छ व्यतिरिक्त भावनगर, अमरेली, जामनगर, राजकोट आणि अहमदाबाद परिसर देखील मध्यम ते उच्च भूकंपप्रवण श्रेणीत मोडतात. आता नुकतेच गुजरातमधील सोमनाथ, गीर भागात भुकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती समोर येत आहे.
गुजरातच्या काही भागांत भुकंपाचे धक्के
गुजरातमधील गिर सोमनाथ जिल्ह्यात तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 3.1 असल्याचे वृत्त आहे. 2026 हे वर्ष काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. या भागात कोणतेही नुकसान किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही. अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तज्ञांचे म्हणणे आहे की या तीव्रतेचे भूकंप सामान्य मानले जातात आणि त्यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता कमी असते. भूकंप म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागाचे अचानक आणि हिंसक हादरे किंवा थरथरणे. हे घडते कारण पृथ्वीचा पृष्ठभाग अनेक मोठ्या टेक्टोनिक प्लेट्सपासून बनलेला आहे, ज्या सतत हळूहळू हलत असतात. जेव्हा या प्लेट्समधील ताण लक्षणीयरीत्या वाढतो आणि त्या अचानक तुटतात किंवा घसरतात, ज्यामुळे ऊर्जा बाहेर पडते, तेव्हा शॉकवेव्हला भूकंप म्हणतात.

भुकंपाच्या काळात बचाव कसा करायचा ?
भूकंपाच्या काळात शांत राहणे आणि योग्य निर्णय घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. भूकंप जाणवला की ताबडतोब “ड्रॉप, कव्हर आणि होल्ड” पद्धत वापरावी. जमिनीवर बसून टेबल किंवा मजबूत फर्निचरखाली आश्रय घ्यावा आणि धरून ठेवावे. घरात असल्यास खिडक्या, काचांची दारे, पंखे किंवा लटकती वस्तूंपासून दूर राहावे. लिफ्टचा वापर टाळावा. बाहेर असल्यास इमारती, झाडे, विजेचे खांब यांपासून दूर मोकळ्या जागेत उभे रहावे. भूकंप शांत झाल्यानंतर लगेच बाहेर पडून सुरक्षित स्थळी जावे आणि गॅस, वीज कनेक्शन तपासावे. अफवा पसरवू नयेत आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.











