हिंदू धर्मानुसार, जेव्हा जेव्हा एखाद्या कामाची सुरूवात केली जाते, तेव्हा प्रथम भगवान गणेशाची प्रार्थना केली जाते. ज्याप्रमाणे आठवड्यातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतो, त्याचप्रमाणे दर महिन्याला येणारी चतुर्थी तिथी भगवान गणेशाला समर्पित असते. या दिवशी उपवास आणि पूजा करून भक्त गणेशाची कृपा मिळवण्याचा प्रयत्न करतात. गणपती बाप्पाला दुर्वा, जास्वंद यापेक्षाही सर्वात जास्त प्रिय असलेला पदार्थ म्हणजे मोदक. पण गणपतीला मोदक आवडण्यामागचे नेमकं कारण काय? असा प्रश्न अनेकांना पडतो. गणपती बाप्पाला मोदक आवडण्यामागे एक कथा सांगितली जाते. जाणून घेऊयात…
पौराणिक कथा
१४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असलेल्या गणरायाशी परशुरामाने युद्ध पुकारले. या युद्धादरम्यान गणरायाचा एक दात तुटला. दात तुटल्याने बाप्पाला काहीही खाता येत नव्हते. त्यामुळे त्याला प्रचंड त्रास होत होता. यामुळे अनेक देवी देवता गणपतीला खाण्यासाठी काय देता येईल? याचा विचार करु लागले. यावेळी मग त्यांच्यासाठी मऊ मोदक बनवले. ते खाऊन गणेश खूप खुश झाले. म्हणून त्यांना एकदंत असेही म्हणतात.

गणेश आणि कार्तिकेय यांच्यातील स्पर्धा
गणेश पुराणानुसार, देवांनी अमृत वापरून एक मोदक बनवला. तो मोदक पार्वती मातेला भेट दिला. तो खास मोदक पाहून गणेश आणि कार्तिकेय यांनी देवीकडे तो मागितला. तेव्हा पार्वती मातेने मोदकाचे महत्त्व सांगितले. त्यामुळे गणेश आणि कार्तिकेय दोघांनाही तो खाण्याची इच्छा झाली. तेव्हा माता पार्वती म्हणाली की, “जो धर्माचे पालन करून श्रेष्ठ होईल आणि सर्व तीर्थांना भेट देऊन लवकर परत येईल त्याला मी हा मोदक देईन.” हे ऐकून कार्तिकेय आपल्या मोरावर बसून तीर्थांना निघाले. पण गणेशजींचे वाहन उंदीर असल्याने ते सर्व तीर्थांना जाऊ शकले नाही. मग त्यांनी एक युक्ती केली. ते आपल्या आई-वडिलांभोवती फिरले आणि त्यांची प्रार्थना केली. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर गणेश आपल्या आई-वडिलांसमोर उभे राहिले. गणपतीची बुद्धी पाहून देवी पार्वती आणि शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी गणपतीलाच तो दिव्य मोदक दिला. तेव्हापासून बाप्पाला मोदक प्रिय झाला. त्यामुळेच त्यांच्या पूजेत मोदकाचा नैवेद्य दाखवतात.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)











