मार्गशीर्ष महिन्याला विशेष असे महत्त्व आहे. या काळात खंडोबाची नवरात्री आणि महालक्ष्मीचे व्रत केले जाते. हा महिना धार्मिकदृष्ट्या अधिक पवित्र मानला जातो. मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून ते षष्ठीपर्यंत सहा दिवस नवरात्री असते. जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात आणि जल्लोषात साजरा करतात. यंदा चंपाषष्ठी 26 नोव्हेंबरला असणार आहे. खंडोबा हे शिवाचे रूप मानले जाते, म्हणून ते सर्वशक्तिमान आणि कल्याणकारी आहेत. अनेक कुळांचे ते कुलदैवत आहेत, त्यामुळे ते कुटुंबाचे संरक्षक आहेत.
चंपाषष्ठीचा नैवेद्य
चंपाषष्ठीला खंडोबा देवतेला नैवेद्य म्हणून वांग्याचे भरीत, बाजरीची भाकरी, पुरण, दहीभात हे मुख्य नैवेद्य आहेत. त्यासोबत लिंबू, गाजर, नवा कांदा इत्यादी गोष्टी देखील दाखवल्या जातात. हा नैवेद्य दाखवून तो प्रसाद म्हणून वाटला जातो आणि काही प्रसाद खंडोबाच्या वाहनांना म्हणजेच कुत्र्यांनाही दिला जातो. चंपाषष्ठीला तळी भरणे हा सुद्धा एक महत्त्वाचा कुळाचार आहे.

चंपाषष्ठी नैवेद्य दाखवण्याची पद्धत
चंपाषष्ठीला देव्हाऱ्यातल्या सगळ्या देवांना पंचामृताचा अभिषेक करावा. चाफ्याची फुले देवाला अर्पण करा. घटावरही छान फुलांची माळ लावा. दिव्याने देवाला ओवाळा. पुरण किंवा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवा. त्यासोबतच वांग्याचे भरीत, बाजरीची भाकरी, नवा कांदा, दही भात, गाजर आणि लिंबू एका ताटात वाढून तो नैवेद्य दाखवा.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)