मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील 11 आरोपींची निर्दोष सुटका; 11 मिनिटांत 7 ठिकाणी स्फोट, 2006 सालचे प्रकरण काय?

2006 साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात उच्च न्यायालयाने आज महत्त्वाचा निकाल दिला. त्यानुसार मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील 11 आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.

मुंबईत 2006 साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात उच्च न्यायालयाने आज 21 जुलै रोजी महत्त्वाचा निकाल दिला.  मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील11 आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती आणि न्यायमूर्ती एस चांडक यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. या साखळी बॉम्बस्फोटात 189 जणांचा मृत्यू झाला होता. तर 827 जण जखमी झाले होते. मुंबईसह अवघ्या देशावर हा मोठा आघात होता. आज 19 वर्षांनी या प्रकरणात निकाल समोर आला आहे.

पोलीस, तपास यंत्रणांना धक्का

उच्च न्यायालयाने याप्रकरणातील सर्व 11 आरोपींना निर्दोष सोडल्याने तपास यंत्रणांना मोठा झटका बसला आहे. दरम्यान, मुंबईतील लोकल ट्रेन्समध्ये 11 मिनिटांत पाच ठिकाणी स्फोट झाले होते. चर्चगेट ते बोरिवली स्थानकांदरम्यान हे स्फोट झाले होते. या स्फोटांसाठी कुकर बॉम्बचा वापर करण्यात होता. मात्र, पोलीस आणि तपास यंत्रणांना याप्रकरणात न्यायालयात योग्यप्रकारे पुरावे सादर न करता आल्यामुळे 11 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. ही बाब पोलीस आणि तपास यंत्रणेचे अपयश अधोरेखित करते.

निर्दोष मुक्तता; अनेक प्रश्न कायम

2015 साली विशेष न्यायालयाने याप्रकरणातील 12 आरोपींना दोषी ठरवत पाच जणांना फाशी आणि सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. पोलिसांनी आपल्याला मारहाण करुन जबाब नोंदवले असा आरोप याप्रकरणातील दोषींनी केला होता. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर या आरोपींनी आनंद व्यक्त केला.

2006 ला नेमकं काय घडलं?

११ जुलै २००६ रोजी मुंबई शहरात एक अत्यंत भयावह दहशतवादी घटना घडली, ज्यात पश्चिम रेल्वे मार्गावरील सात लोकल ट्रेनमध्ये काही मिनिटांच्या अंतराने स्फोट घडवून आणण्यात आले. संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी, सुमारे ६:२४ ते ६:३५ या दरम्यान, माटुंगा, माहिम, बांद्रा, जोगेश्वरी, बोरीवली, खांडिवली आणि मीरा रोड या स्टेशनजवळ असलेल्या ट्रेनमध्ये प्रेशर कुकरमध्ये ठेवलेले स्फोटक वापरून एकामागून एक सात बॉम्बस्फोट घडवण्यात आले. या स्फोटांमध्ये २०९ लोकांचा मृत्यू झाला आणि सुमारे ७०० लोक गंभीर जखमी झाले. संपूर्ण मुंबई शहरात काही तासातच भीतीचे आणि अराजकतेचे वातावरण निर्माण झाले.
या हल्ल्यांमागे ‘लष्कर-ए-तोयबा’ आणि ‘SIMI’ या दहशतवादी संघटनांचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आणि अनेक संशयितांना अटक करण्यात आली. या हल्ल्यांचा उद्देश भारतात धार्मिक तेढ वाढवणे आणि मुंबईसारख्या आर्थिक राजधानीमध्ये अस्थिरता निर्माण करणे हा होता. ही घटना देशातील रेल्वेवर झालेल्या सर्वात भयानक दहशतवादी घटनांपैकी एक मानली जाते आणि यानंतर रेल्वे सुरक्षा व्यवस्था आणि गुप्तचर प्रणालीमध्ये मोठे बदल करण्यात आले.

About Author

Rohit Shinde

Other Latest News