Bachhu Kadu : आमदार खासदारांच्या घरात बिबट्या घुसला पाहिजे – बच्चू कडू

बिबट्या आमदार खासदारांच्या घरात घुसत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही. बिबट्या सध्या फक्त शेतकऱ्यांच्या घरात घुसतो. बिबट्या आमदार खासदारांच्या घरात घुसला पाहिजे, तो कलेक्टरच्या घरात घुसला पाहिजे, मीडियावाल्यांच्या घरात घुसला पाहिजे

Bachhu Kadu : सध्या महाराष्ट्र राज्य विधिमंडळ अधिवेशनात बिबट्याचा विषय चर्चेत आहे. मागील काही महिन्यात बिबट्याचा मानवी वस्तीतील वाढत प्रभाव आणि हल्ले यामुळे सर्वसामान्य जनता भीतीच्या छत्रछायेखाली आहे. अशावेळी बिबट्या मानवी वस्तीत येऊ नये म्हणून सरकार जंगलातच शेळ्या किंवा बकऱ्या सोडण्याचा निर्णय सरकार घेणार आहे. सरकारच्या या निर्णयानंतर बच्चू कडू यांनी सरकारला धारेवर धरले. बिबट्या आमदार खासदारांच्या घरात घुसत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही असं बच्चू कडू यांनी म्हंटल. तसेच जाऊ तिथं खाऊ हे सरकारचे धोरण असल्याची टीकाही त्यांनी केली.

काय म्हणले बच्चू कडू ?

प्रसारमाध्यमांशी बोलताना बच्चू कडू (Bachhu Kadu) म्हणाले, बिबट्या आमदार खासदारांच्या घरात घुसत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही. बिबट्या सध्या फक्त शेतकऱ्यांच्या घरात घुसतो. बिबट्या आमदार खासदारांच्या घरात घुसला पाहिजे, तो कलेक्टरच्या घरात घुसला पाहिजे, मीडियावाल्यांच्या घरात घुसला पाहिजे… मगच सरकारला जाग येणार… एखाद्या आमदाराचा रस्त्यावर एक्सीडेंट झाला तर लगेच तो रस्ता दुरुस्त केला जातो. मुख्यमंत्री ज्या रस्त्याने जातात त्या रस्त्यावर खड्डा दिसणार नाही याची काळजी घेतली जाते… आणि दुसरीकडे आमचा शेतकरी रोज मरतोय त्याकडे कोणाचं लक्ष नाही. हे असं असतं का रयतेचं राज्य? तुम्हाला लाज वाटली पाहिजे दरवर्षी 400 500 लोक मरतात असं म्हणत बच्चू कडू यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. जाऊ तिथं खाऊ हे सरकारचे धोरण आहे.1000 शेळ्या सोडल्या असं सांगणार आणि 200 शेळ्या सोडणार. बाकीचे हेच खाणार.

सरकारचा प्लॅन काय ?

बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी सरकारने अजब प्लॅन आखला आहे. बिबट्या मानवी वस्तीत येऊ नये म्हणून जंगलातच शेळ्या किंवा बकऱ्या (Goats) सोडण्याचा निर्णय सरकार घेणार आहे. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी याबाबत माहिती दिली. जसा प्रत्येक गावात एक नंदी असतो, तशाचप्रकारे या शेळ्या-बकऱ्या असतील. तुमच्या मुलाबाळांना आणि कुटुंबाच्या सदस्यांना बिबट्याचा धोका होऊ नये म्हणून काही ठिकाणी वनखात्याने या शेळ्या सोडल्या आहेत असे गणेश नाईक यांनी सांगितलं.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News