नवी दिल्ली- बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या विरोधात मनी लाँड्रिंग केसमध्ये ईडीची चौकशी आणि कारवाई सुरुच राहणार आहे. दिल्ली हाकोर्टानं गुरुवारी या ईडी कारवाईविरोधातली याचिका फेटाळून लावलीय. याचिकेत ईडीची एफआयआर रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती.
ईडीने घोटाळेबाज सुकेश चंद्रशेखर याच्याशी संबंधित 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात एफआयआर दाखल केलेली आहे. यात जॅकलिनचाही आरोपीच्या नावांत समावेश आहे.

रॅनबॅक्सीच्या प्रवर्कांकडून 200 कोटी लाटले होते
तिहार जेलमध्ये असलेले रॅनबॅक्सीचे माजी प्रवर्तक शिविंदर सिंह आणि मालविंदर सिंह यांना जेलमधून बाहेर काढण्याचं आमिष जेलमध्ये सुकेशनं दाखवलं होतं. पंतप्रधान कार्यालय आणि गृहमंत्रालयाशी संबंधित अधिकारी असल्याचं सुकेश जेलमध्ये त्यांना सांगत होता.
त्याच्या या फसवणुकीच्या कटात तिहार जेलमधील अनेक अधिकारीही सामील होते. सुकेश या अधिकाऱ्यांनाही मोठी रक्कम देत होते. त्यानंतर ईडीनं सुकेशच्या विरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणात सुकेशची पत्नी लीना पॉल हीही आरोपी आहे. चैन्नईच्या एका कंपनीतच्या माध्यमातून पैशांची अफरातफर केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलाय.
मनी लाँड्रिंग प्रकरणात सुकेश चंद्रेशेखर आणि लीनाला दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. पोलिसांनी या प्रकरणात महाराष्ट्रात मकोका कायदा लावला आहे.
सुकेश प्रकरणात जॅकलिनच्या नावाचा समावेश
ईडीच्या माहितीनुसार सुकेश आणि जॅकलिन यांच्यात जानेवारी 2021 साली बोलणं सुरु झालं होतं. तिहार जेलमध्ये असतानाही सुकेश जॅकलिनशी फोनवर बोलत होता. जॅकलिनला या काळात सुकेशनं कोट्यवधी रुपयांच्या भेटवस्तू दिल्याचा ईडीचा दावा आहे. यात 52 लाखांचा एक अरबी घोडा, 9-9 लाखांच्या तीन पर्शियन मांजरी, हिरे यासारख्या भेटवस्तूंचा समावेश आहे.
जॅकलिनसाठी चार्टर्ड प्लेनची तिकिटं, सोनं, डायमंड ज्वेलरी, इंम्पोर्टेड क्रॉकरीही सुकेशनं तिला दिली होती. यासह जॅकिलनच्या भावासोबतही सुकेशचे आर्थिक व्यवहार असल्याचं समोर आलंय. जॅकलिनसोबत नात्यात असल्याचा दावाही सुकेशनं केला होता.
सुकेशचं बॉलिवूड कनेक्शन पत्नीनं सांगितलं
2010 साली सुकेशचा मॉडेल आणि अभिनेत्री लीना पॉलशी परिचय झाला होता. लीनानं त्यापूर्वी मद्रास कॅफे सिनेमात काम केलं होतं. त्यानंतर दोघांचा परिचय वाढला आणि ते एकत्रित काम करत होते. याच कारणानं सुकेशची बॉलिवूड क्षेत्रात एन्ट्री झाली. त्यानंतर बॉलिवूडमधील लोकांना फसवण्यात लीनाही त्याला साथ देऊ लागली होती. 2015 साली दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अनेक अभिनेत्रींशी सुकेशच्या अफेअरची चर्चाही रंगल्या होत्या.











