देशात सायबर फसवणुकीच्या अपराधांचे प्रमाण वेगाने वाढत चालले आहे. दररोज कुठेना कुठेतरी सायबर फ्रॉडच्या घटना घडतच असतात. गृह मंत्रालयाने या गुन्ह्यांच्या संदर्भात अतिशय खळबळजनक माहिती लोकसभेत दिली. सरकारी आकडेवारीनुसार मागील वर्षात (2024) सायबर फसवणुकीचे बळी ठरलेल्या लोकांकडून सायबर भामट्यांनी तब्बल 22 हजार 845 कोटी रुपये उकळले आहेत. अनेक लोक अशा सायबर फसवणुकीला बळी पडत असतात.
सायबर फ्रॉडच्या घटनांमध्ये मोठी वाढ
2023 मध्ये हा आकडा 7 हजार 465 कोटी रुपये इतका होता. म्हणजेच फक्त एकाच वर्षात या अपराधांच्या प्रमाण 200 टक्के वाढ झाली आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री बंदी संजयकुमार यांनी माहिती देताना सांगितले की नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल आणि गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सिटिजन फायनान्शियल सायबर फ्रॉड अडँ मॅनेजमेंट सिस्टीमवर 36.40 लाख प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.

सन 2023 मध्ये आर्थिक फसवणुकीचे 24.4 लाख प्रकरणे नोंदवण्यात आली होती. याचा अर्थ असा की प्रत्येक वर्षात ऑनलाइन फसवणुकीची प्रकरणे वाढत गेली आहेत. NCRP पोर्टलवर नोंदवलेल्या एकूण सायबर अपराधांत 2024 मध्ये 22.7 लाख प्रकरणे आहेत. 2023 मध्ये 15.9 लाख केस दाखल झाल्या होत्या. ही आकडेवारी धक्कादायक अशीच आहे.
फसवणुकीपासून बचाव कसा करावा?
यबर फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी सतर्कता अत्यंत आवश्यक आहे. अनोळखी व्यक्तींकडून आलेले लिंक, ईमेल किंवा मेसेज उघडू नका. आपली बँक माहिती, OTP, पासवर्ड इतर कोणालाही शेअर करू नका. सोशल मीडियावर खोटी प्रोफाईल्स टाळा. मोबाईल व संगणकाला मजबूत पासवर्ड व अँटी-व्हायरस प्रोटेक्शन द्या. सार्वजनिक Wi-Fi वापरताना महत्त्वाची कामे करू नका. अधिकृत वेबसाईटवरूनच व्यवहार करा. कुठलीही फसवणूक वाटल्यास सायबर पोलिसांकडे त्वरित तक्रार करा. सतत अपडेट राहा आणि डिजिटल व्यवहार करताना काळजी घ्या. सुरक्षित इंटरनेट वापर ही काळाची गरज आहे. कोणत्याही परिस्थितीत वैयक्तिक माहिती देऊ नका. सॉफ्टवेअर आणि डिव्हाइस नेहमी अपडेट ठेवा. सार्वजनिक ठिकाणच्या वायफायचा वापर आजिबात करू नका.











