कल्याण- कल्याणच्या नांदिवली परिसरातली ही धक्कादायक घटना घडलीय. गोकूळ झा नावाच्या परप्रांतीयानं रिसेप्शनिस्ट तरुणीला बेदम मारहाण केली आहे. हिंदी-मराठी वादाच्या पार्श्वभूमीर या परप्रातियानं केलेही ही मारहाण आता चर्चेचा आणि राजकारणाचा विषय ठरली आहे.
मनसे आणि ठाकरेंची शिवसेना या वादानंतर आक्रमक झाली असून फरार झालेल्या आरोपीला तातडीनं अटक करण्याची मागणी करण्यात आलीय. अन्यथा मनसे स्टाईल इंगा दाखवण्याचा इशारा देण्यात आलाय. सराकरनंही या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे.

नेमकं काय घडलं?
सोमवारी संध्याकाळी डॉ. अनिकेत पालांडे यांच्या बाल चिकित्सालय क्लिनिकमध्ये गोकुळ झाला हा आरोपी पेशंट बहिणीला घेऊन आला होता. मात्र डॉक्टर एमआर सोबत बिझी होते.त्यामुळं तिथं रिसेप्शनिस्ट असलेल्या मराठी तरुणीनं गोकूळ झा आणि त्याची बहीण अनन्या झा यांना थांबायला सांगितलं. तुमचा नंबर आल्यावर डॉक्टर बोलावतील, असं तिनं सांगितलं.
एवढंच निमित्त झालं आणि या परप्रांतीय तरुणाचा माजोरडेपणा उफाळून आला. त्यानं रिसेप्शनिस्ट तरुणीशी वाद घालायला सुरुवात केली. आजुबाजूच्या माणसांनी, अगदी पेशंट बहिणीनं त्याला दोनवेळा क्लिनिकबाहेर नेलं. पण रागानं फणफणत पुन्हा आत आला. त्यानं मराठी तरुणीच्या थेट पोटात लाथ घातली. एवढ्यावरच हा राक्षस थांबला नाही तरुणीच्या केसांना धरुन त्यानं तिला फरफटत ओढलं. हा हल्ला एवढा अचानक झाला की, तरुणी पुरती भांबावून गेली. जागेवरच कळवळून रडू लागली.
घटनेनंतर आरोपी गोकुळ झा पळाला
या रिसेप्शनिस्ट मुलीला आईवडील नाहीत.3 बहिणी आणि एक भाऊ असं त्यांचं कुटुंब. क्लिनिकमध्ये नोकरी करून ती कुटुंबाची गुजराण चालवते. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. धक्कादायक बाब म्हणजे तिला मारहाण करणारा गोकूळ झा या घटनेनंतर पळून गेलाय. 24 तास उलटले तरी तो अजून पोलिसांना सापडलेला नाहीय.
घटनेनंतर राजकारण तापलं
मराठी तरुणीला परप्रांतीय तरुणानं बेदम मारहाण केल्याच्या या प्रकरणानं आता राजकीय वळण घेतलंय. मनसे कार्यकर्त्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात जाऊन एसीपींना निवेदन दिलं. पोलिसांना आरोपी सापडत नसेल तर त्याला मनसे स्टाईल धडा शिकवण्यात येईल, असा इशारा मनसे नेत्यांनी दिलाय. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते दीपेश म्हात्रे यांनीही आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांना अल्टीमेटम दिलाय. तर गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतलीय. आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिलीय.
किरकोळ वादातून एवढी बेदम मारहाण करणं हे फारच गंभीर आहे. त्यात डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये हा प्रकार घडावा, हे आणखीच दुर्दैवी. एवढं होऊनही 24 तास उलटले तरी तो माजोरडा आरोपी पोलिसांना सापडत नाही, हे मोठं अपयश मानण्यात येतंय.











