मुंबईतील महिला आणि तरूणींच्या सुरक्षेचा प्रश्न आता दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करताना दिसत आहे. मुंबईतील वांद्रे परिसरात धावत्या रिक्षात तरुणीचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. सिग्नल लागल्याने चौकात रिक्षा थांबली. त्यावेळी अचानक तरुण रिक्षात घुसला, आणि त्याने तरूणीचा विनयभंग केला. पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी तपास सुरू आहे.
नेमकं काय घडले?
भर दुपारी रिक्षात एका अनोळखी इसमाने रिक्षात शिरून १६ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग केल्याची घटना वांद्रे येथे घडली. सिग्नल लागल्याने चौकात रिक्षा थांबली. त्यावेळी अचानक तरुण रिक्षात घुसला. तरुणी आणि रिक्षा चालकाने त्याला खाली उतरण्याचे सांगताच त्याने शस्त्राचा धाक दाखवला. त्याने अश्लील शेरेबाजी केली. पुढील चौक येताच त्याने पोबारा केला. पोलिसांनी आरोपीला अटक केल्याची माहिती समोर येत आहे. रिक्षा सिग्नलला थांबली असताना आरोपी रिक्षात शिरला आणि चालकाला शस्त्राचा धाक दाखवून रिक्षा सुरू ठेवायला सांगितली. यानंतर त्याने धावत्या रिक्षात मागील आसनावर बसलेल्या महाविद्यालयीन तरूणीचा विनयभंग केला.

तक्रारीनंतर आरोपी अटकेत
रिक्षाचालक आणि त्या तरूणीने त्याला खाली उतरायला सांगितले. मात्र तो उतरायला तयार नव्हता , मला काही अंतरच पुढे जायचे आहे. दुसरी रिक्षा मिळत नाही असे सांगून तो जबरदस्तीने आत बसून राहिला. तरुणी आणि रिक्षाचालक त्याला उतरायला सांगत असतानाच सिग्नल सुटताच त्याने धारदार शस्रासारखी एक वस्तू काढली. रिक्षा थांबवायची नाही, अन्यथा मारून टाकेन अशी धमकी त्याने दिली.
या प्रकारामुळे रिक्षाचालक आणि ती तरुणी दोघेही घाबरले. रिक्षा सुरू होताच त्याने अश्लील शेरेबाजी करीत तरुणीचा विनयभंग केला. पुढील सिग्नलवर रिक्षा थांबल्यावर तो उतरून पळून गेला. त्यानंतर घाबरलेल्या तरूणीने घडलेला प्रकार घरी सांगितला. त्यानंतर पालकांनी या घटनेची पोलिसांत तक्रार केली, पोलिसांकडून संबंधित आरोपीला अटक केल्याची माहिती समोर येत आहे. अधिकचा तपास सुरू आहे.











