पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर सामनातून कडक शब्दांत भाष्य करण्यात आले आहे. पोलीस आणि गृहविभागाला गुन्हेगारी रोखण्यात अपयश येत असल्याचे देखील त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे. पुणे शहरातील तळजाई टेकडीवर पोलीस भरतीसाठी सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांवर काही लोकांनी हल्ला केल्याची घटना घडली. याच पार्श्वभूमीवर सामनातून यावर टीका करण्यात आली आहे.
पुण्यात गुन्हेगारी बोकाळली, पोलीस अपयशी?
‘विद्येचे माहेरघर आणि सुसंस्कृत पुणे अशी बिरुदावली अभिमानाने मिरवणाऱ्या पुण्यात दिवसेंदिवस बोकाळत चाललेली गुन्हेगारी पाहता पुण्याची मूळ ओळखच मिटून जाते की काय, अशी भयावह परिस्थिती हल्ली पुणे शहरात निर्माण झाली आहे. पोलिसांचा गुन्हेगारांवर आणि गृहखात्याचा पोलिसांवर वचकच न राहिल्याने कधी काळी शांत असलेले पुणे आता कमालीचे अशांत बनले आहे. खून, मारामाऱ्या, बलात्कार, खंडणी वसुलीच्या घटनांमुळे पुण्यात गुंड टोळ्यांची दहशत निर्माण झाली आहे. शहराच्या विविध भागांत गुन्हेगारांच्या टोळ्या वाढीस लागल्या व त्या भागांत कायद्याचे नव्हे, तर गुन्हेगारांचेच राज्य निर्माण झाले.’ अशा शब्दांत पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर सामनातून भाष्य करण्यात आले आहे.

तळजाई टेकडीवर तरूण-तरूणींना मारहाण
पुण्याच्या तळजाई टेकडीवरील ताजी घटना तर पुणे पोलिसांसाठी लांच्छनास्पद म्हणावी अशीच आहे. फिटनेस अकादमीचे दीडशे ते दोनशे तरुण-तरुणी रोज तळजाई टेकडीवर पोलीस भरतीचा सराव करण्यासाठी येतात. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे टेकडीवर सरावासाठी आलेल्या तरुणींना सुमारे 50 ते 60 पैलवान गुंडांच्या टोळक्याने धक्काबुक्की केली. सरावाच्या मैदानावर प्रशिक्षणार्थी मुले-मुली पोहोचल्या तेव्हा अगोदरच चार गुंड मैदानात येऊन थांबले होते. इथून बाजूला सरका व आम्हाला सराव करू द्या, अशी विनंती मुलींनी या चौघांना केली असता त्यांनी सरळ या तरुणींना ढकलून धक्काबुक्की व शिवीगाळ देण्यास सुरुवात केली. त्यापाठोपाठ अन्य 50-60 पैलवानांचे टोळके तिथे येऊन धडकले, आणि गोंधळ आणखीच वाढला.
गृहखाते आणि पोलीस यंत्रणेवर ताशेरे
‘अकादमीतील प्रशिक्षणार्थी मुलांनी या पैलवान टोळक्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही बेदम मारहाण करण्यात आली. महाराष्ट्राच्या पोलीस दलात नोकरी मिळवण्यासाठी प्रशिक्षण घेणाऱ्या लेकींवर हात टाकताना पैलवान गुंडांच्या टोळक्याला जनाची वा मनाची तर लाज वाटली नाहीच, पण पोलिसांचे भयदेखील वाटले नाही. गुन्हेगारांच्या मनातील भीती संपुष्टात येणे हे पोलीस प्रशासनाचे व पर्यायाने राज्याच्या गृहखात्याचे म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अपयश आहे, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरू नये.’ अशा शब्दांत पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर पोलीस यंत्रणा आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य करण्यात आले आहे.











