बीडमधील तरूणाला थेट पाकिस्तानातून मेसेज; राम मंदीर उडविण्याच्या कटात सहभागी होण्याची ऑफर, नेमकं प्रकरण काय?

एका युवकाला सोशल मीडियावरून अयोध्येतील श्रीराम मंदिर उडवण्याची धमकी देणारा मेसेज मिळाल्याने खळबळ उडाली आहे. त्याला या प्रकरणात सहभागी होण्याची ऑफर देण्यात आली, प्रकरणाचा तपास सुरू आहे.

अयोध्येतील श्रीराम मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत आहेत. रामललाच्या दर्शनासाठी देशभरातून येणाऱ्या भक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भाविकांच्या सोयीसाठी योग्य सुविधा, पाण्याची व्यवस्था, रांगेतील शिस्त यावर प्रशासन भर देत आहे. मंदिर परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून, सीसीटीव्ही कॅमेरे, मेटल डिटेक्टर आणि पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सुरक्षेची योग्य काळजी घेतली जात असताना आता थेट पाकिस्तानातून धमकीचा मेसेज मिळाल्याची माहिती समोर येत आहे.

बीडमधील तरूणाला थेट पाकिस्तानातून मेसेज?

बीडमधील शिरूर कासार येथील एका युवकाला सोशल मीडियावरून अयोध्येतील श्रीराम मंदिर उडवण्याची धमकी देणारा मेसेज मिळाल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, हा मेसेज पाकिस्तानातून आल्याचे उघडकीस आले असून, संबंधित व्यक्तीने आपली ओळख पटवण्यासाठी कराचीमधील लोकेशनही पाठवले आहे, असे पीडित युवकाने सांगितले. या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अगदी कसोशीने तपास करत आहेत.

अयोध्येतील राम मंदीर उडविण्याचा कट रचला?

या प्रकारामुळे परिसरात चिंता पसरली असून, संबंधित युवकाने शिरूर कासार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्याने दिलेल्या माहितीप्रमाणे, सोशल मीडियावर संवाद साधताना एका अनोळखी व्यक्तीने त्याला राम मंदिर उडवण्याच्या कटात सहभागी होण्याची ऑफर दिली. यासाठी त्याला एक लाख रुपये देण्याचेही आश्वासन देण्यात आले होते.मेसेजमध्ये स्पष्ट उल्लेख होता की अयोध्येतील राम मंदिर आरडीएक्ससारख्या स्फोटकांनी उद्ध्वस्त करायचे असून, या कामात सहभागी होण्यासाठी एकूण ५० जणांची आवश्यकता आहे. प्रत्येकाला एक लाख रुपये देण्यात येणार असल्याचेही नमूद करण्यात आले होते.

शिवाय, स्फोटक पुरवण्याची जबाबदारीही संशयित व्यक्तीने घेण्याचे सांगितले.याप्रकरणी पोलिसांनी गंभीर दखल घेत गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सुरु आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळालेली ही धमकी देशाच्या सुरक्षेला आव्हान ठरणारी असून, यामागे कुणाचा हात आहे, हे शोधण्याचे प्रयत्न पोलीस करत आहेत. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी स्थानिक प्रशासन, पोलिस आणि स्वयंसेवक सातत्याने काम करत आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व उपाययोजना राबवण्यात येत आहेत. भाविकांनी सहकार्य करणे आणि नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News