मराठी सिनेसृष्टी हादरली, काम मिळत नसल्यानं एका तरुण अभिनेत्याची आत्महत्या

Smita Gangurde

मुंबई – विविधांगी भूमिका साकारणारा अभिनेता आणि लेखक तुषार घाडीगावकर यानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. तुषारच्या आकाली एक्झिटनं मराठी सिनेसृष्टीला चांगलाच धक्का बसलाय.

तुषार घाडीगावकर हा अष्टपैलू अभिनेता होता. संगीत बिबट आख्यान या नाटकात त्यानं काम केलं होतं. त्यासोबतच छोट्या पडद्यावर लवंगी मिरची, मन कस्तुरी रे, सुखांच्या सरींनी हे मन बावरे अशा मालिकांमध्येही तो दिसला होता. झोंबिवली, उनाड, भाऊबळी या सिनेमातही त्यानं महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. मात्र गेल्या काही महिन्यांपासून काम मिळत नसल्यानं तो तणावात होता. या तणावातूनच त्यानं आत्महत्येचंटोकाचं पाऊल उचलल्याचं सांगण्यात येतंय.

तणावातूनच आत्महत्येचं टोकाचं पाऊल

तुषार हा मूळचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीचा राहणारा होता. नाटकातून त्यानं अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. मुंबईच्या रुपारेल कॉलेजातील नाट्य विभागात तुषारनं मेहनतीनं स्वत:चं स्थान निर्माण केलं होतं. कॉलेजनंतर तुषारनं नाटक, मालिका, सिनेमा असा प्रवास केला होता. अचानक त्यानं केलेल्या आत्महत्येनं सगळेचजण हादरले आहेत.

दोन आठवड्यांपूर्वी सोशल मीडियावर फोटो

तुषारनं दोन आठवड्यांपूर्वीच सोशल मीाडियावर त्याचा हसरा फोटो टाकला होता. आता त्याच्या आत्महत्येच्या बातमीनंतर या फोटोला अनेक सेलिब्रिटींनी कॉमेंट करत त्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे. अभिनेता वैभव मांगले, समीर पाटील तर अभिनेत्री मुग्धा गोडबोले यांनी तुषारच्या मृत्यूमुळे धक्का बसल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

अपेक्षा आणि वास्तवाची कुतरओढ

अभिनेता वैभव मांगले यानं व्यक्त केलेल्या श्रद्धांजलीत, अपेक्षा आणि वास्तव यांचा मेळ बसत नाही, असं लिहिलंय. या दोन्हीतील अंतर वाढत असताना, उत्तरं काढायला वेळ नाही, आत्मीयता नसल्यानं माणसं एकटी पडत जात असावीत असा सूर व्यक्त केलाय. तर काही जणांना आत्महत्या हा मार्ग नसल्याचं म्हटलय.

आत्महत्येचं टोकाचं पाऊल कशामुळे?

मराठी आणि  हिंदी सिनेसृष्टीत काम मिळत नसल्यानं अनेक कलावंत हे नैराश्यात असतात. यापूर्वीही काम मिळत नसल्यानं असे प्रकार घडले आहेत. हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येमागेही हेच कारण असल्याचं सांगण्यात येतंय. देशीतील विविध भागांतून किंवा राज्यातील खएडेगावातून शहरात येणारे  तरुण-तरुणी मोठ्या  अपेक्षा घेऊन सिनेसृष्टीत येतात. मात्र सातत्यानं भूमिका मिळण्यात येणाऱ्या अडचणी, त्यातही मराठी सिनेमांना मिळणारा कमी प्रतिसाह, कमी बजेट यामुळे कलाकारांना या दुष्टचक्रातूनच जावं लागतं. त्यातही नाटक, छोट्या  पडद्यावरच्या मालिकांतही अभिनयाचं  काम मिळालं नाही तर मुंबईसारख्या शहरांत राहायचं  कसं असा प्रश्न निर्माण होतो. हे दुष्टचक्र भेदण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करण्याची आणि  परिस्थितीवर मात करण्याची इच्छाशक्ती सगळ्यांकडेच असते असं नाही. यातूनच अशा घटना घडतात.

ताज्या बातम्या