बॉलीवूडमधील आघाडीचा अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आपल्या शिस्तप्रिय आणि नम्र स्वभावासाठी ओळखला जातो. चाहत्यांशी मनमोकळा वागणारा आणि नेहमी त्यांच्या प्रेमाला मान देणारा म्हणून अक्षयला ओळखलं जातं. मात्र हाच अक्षय कुमार सध्या त्याच्या एका कृतीमुळे अडचणीत आलाय. मुंबई एअरपोर्टवर अक्षय कुमार एका चाहत्यावर संतापल्याचे पाहायला मिळालं. त्यामागचं कारणही तितकंच महत्त्वाचं होतं.
नेमकं काय घडलं ? Akshay Kumar
घटनेनुसार, अक्षय कुमार आपल्या मुलगी नितारा भाटियासोबत मुंबई एअरपोर्टवर आला होता. त्याला पाहताच अनेक चाहते त्याच्याभोवती जमा झाले आणि सेल्फी घेण्यासाठी गर्दी झाली. नेहमीप्रमाणे अक्षयने सर्वांची इच्छा पूर्ण करत त्यांच्या सोबत फोटो काढून दिले. मात्र, या गर्दीत एक चाहता इतका जवळ आला की त्याने अक्षयच्या खांद्यावर हात ठेवला. हा प्रकार अक्षयला खटकला आणि त्याने त्वरित त्या व्यक्तीला फटकारलं. “हात खाली, हात लावू नको,” असं ठामपणे सांगत अक्षयने आपली नाराजी व्यक्त केली. संबंधित चाहत्याने क्षणातच आपला हात मागे घेतला आणि परिस्थिती अधिक चिघळण्याआधीच अक्षयने शांतपणे आपली मुलगी नितारासोबत टर्मिनलकडे वाटचाल केली.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
ही संपूर्ण घटना तिथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी त्यांच्या मोबाईलमध्ये कैद केली आणि सोशल मीडियावर पोस्ट केली. काही तासांतच ही क्लिप इंटरनेटवर पसरली आणि नेटिझन्सनी यावर आपली मतं मांडायला सुरुवात केली. बहुतांश लोकांनी अक्षयच्या वागण्याचं कौतुक केलं आणि त्याची शांत आणि संयमी प्रतिक्रिया प्रशंसनीय असल्याचं म्हटलं. काहींनी चाहत्यांनीही मर्यादा ओळखायला हव्यात आणि सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आयुष्याचा आदर करायला हवा, असंही सांगितलं.
अक्षय कुमारचा (Akshay Kumar) चाहत्यांशी कायमच प्रेमळ संबंध राहिला आहे. तो अनेकदा चाहत्यांना वेळ देतो, फोटोसाठी थांबतो आणि त्यांच्या भावना समजून घेतो. मात्र ही घटना सिद्ध करते की, त्यालाही आपली खासगी जागा हवी आहे आणि कोणी ती ओलांडल्यास तो त्यावर कठोरपणे प्रतिक्रिया देतो. प्रसिद्धीच्या झगमगाटामध्येही वैयक्तिक मर्यादा राखणं किती महत्त्वाचं आहे, हे अक्षयच्या वागणुकीतून स्पष्ट दिसून आलं.











