अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अतिवापर आणि सोशल मीडियाच्या बेफाम वापरामुळे आजकाल खरे आणि खोटे यामधील फरकच अनेकदा समजत नाही. नुकताच अभिनेता अक्षय कुमार याच्या नावाने व्हायरल झालेला डीपफेक व्हिडीओ हे त्याचे ठळक उदाहरण ठरले. या व्हिडीओमध्ये अक्षय कुमार महर्षी वाल्मिकी यांच्या वेशात दिसत असून, तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. या खोट्या व्हिडीओने मोठी खळबळ उडाली होती.
अक्षयने दाखल केली होती याचिका
या प्रकारामुळे अक्षय कुमारने मुंबई उच्च न्यायालयात थेट याचिका दाखल केली. त्याने आपल्या फोटोचा आणि वैयक्तिक हक्कांचा भंग झाल्याचा आरोप करत कायदेशीर मदत मागितली. त्याच्या मते, डीपफेक व्हिडीओ आणि त्यात वापरलेली त्याची इमेज केवळ खोटी असून, यामुळे त्याच्या सामाजिक आणि व्यावसायिक प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला आहे. शिवाय, अशा प्रकारच्या खोट्या सामग्रीचा वापर धार्मिक भावना भडकवण्यासाठी होऊ शकतो, याचीही शक्यता त्याने याचिकेत नमूद केली.

कोर्टाने काय आदेश दिले –
मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून, अशा प्रकारचे डीपफेक व्हिडीओ आणि एआयवर आधारित बनावट कंटेंट इंटरनेटवरून तात्काळ हटवण्याचे आदेश दिले आहेत. युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स (पूर्वीचे ट्विटर) आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना या संदर्भात कडक निर्देश देण्यात आले आहेत. केवळ हटवणेच नव्हे, तर अशा प्रकारची सामग्री पुन्हा अपलोड होणार नाही याकडे लक्ष्य देण्याचेही आदेश देण्यात आले.
न्यायालयाने आपल्या निरीक्षणात स्पष्ट केले की, अशा स्वरूपातील बनावट कंटेंट समाजासाठी अत्यंत घातक ठरू शकतो. डीपफेक व्हिडीओ इतके वास्तवदर्शी असतात की खरे आणि खोटे ओळखणे सामान्य लोकांसाठी अवघड ठरते. त्यामुळे अशा व्हिडीओंचा वापर वैयक्तिक बदनामी, धार्मिक तेढ वाढवणे किंवा सामाजिक अराजक माजवण्यासाठी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अक्षय कुमार प्रमाणेच अनेक कलाकार, जसे की हृतिक रोशन, ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनीही अशाच प्रकारच्या बनावट व्हिडीओ किंवा फोटो मॉर्फिंगविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. यावरून हे स्पष्ट होते की, सेलिब्रिटींच्या फोटोचा गैरवापर ही एक गंभीर समस्या बनली आहे आणि तिला आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना आवश्यक आहेत.