Crime News : फरहान अख्तरच्या आईसोबत 12 लाखांची फसवणूक ; नेमकं काय घडलं?

Asavari Khedekar Burumbadkar

बॉलीवूड फिल्म अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तर यांच्या आई हनी ईरानी यांच्यासोबत सुमारे १२ लाख रुपयांची फसवणूक (Crime News) झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी फरहान अख्तर यांच्या खासगी चालकासह बांद्रा तलावाजवळील पेट्रोल पंपावरील एका कर्मचाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं काय घडलं? Crime News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेश सिंह या ३५ वर्षीय चालकाने फरहान अख्तर यांच्या नावावर जारी केलेल्या क्रेडिट कार्डांचा गैरवापर केला. तो या कार्डांचा वापर करून हनी ईरानी यांच्या गाड्यांमध्ये पेट्रोल भरल्याचे दाखवायचा. मात्र चौकशीत समोर आले की तो प्रत्यक्षात पेट्रोल भरत नसे. तो कार्ड स्वाइप करत असे आणि पेट्रोल पंपावरील कर्मचारी अरुण सिंह (वय ५२) त्याला त्या बदल्यात रोख रक्कम परत करत असे. या रकमेचा काही भाग ते स्वतः ठेवत होते आणि उरलेली रक्कम नरेशला दिली जात होती.

या प्रकाराचा तपास फरहान अख्तर यांची मॅनेजर दिया भाटिया (वय ३६) यांनी सुरू केला. त्यांच्या लक्षात आले की एका ३५ लिटर टाकी क्षमतेच्या गाडीत ६२ लिटर पेट्रोल भरल्याचे बिल बनवले गेले होते. याशिवाय, जी गाडी सात वर्षांपूर्वीच विकली गेली होती, त्या गाडीमध्येही पेट्रोल भरल्याचे व्यवहार कार्डवर दर्शवले गेले होते. तपासात असेही समोर आले की चालक नरेश सिंहने केवळ एकच नव्हे, तर फरहान अख्तर यांच्या नावाने जारी केलेल्या तीन वेगवेगळ्या कार्डांचा वापर फसवणुकीसाठी केला होता. विचारणा केली असता त्याने समाधानकारक उत्तर देण्यास नकार दिला आणि अखेर चौकशीत फसवणुकीची कबुली दिली. Crime News

जुन्या चालकाकडून कार्ड घेतली होती

त्याने पोलिसांना सांगितले की २०२२ मध्ये त्याने फरहान अख्तरच्या माजी चालकाकडून ही कार्डे घेतली होती. त्यानंतर तो बांद्रा येथील SV रोडवरील पेट्रोल पंपावर कार्ड स्वाइप करायचा. प्रत्यक्षात पेट्रोल भरले जायचे नाही, परंतु त्याला प्रत्येक वेळी एक हजार ते पंधराशे रुपयांपर्यंत रोख रक्कम मिळायची. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ४०६ (विश्वासघात), ४२० (फसवणूक) आणि ३४ (सहभाग) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

ताज्या बातम्या