प्रसिद्ध अभिनेता प्रभास सध्या अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये व्यस्त आहे, आणि त्यापैकी एक महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट म्हणजे ‘कल्कि 2898 AD’ या भव्य साय-फाय चित्रपटाचा सिक्वेल. या चित्रपटाच्या पहिल्या भागाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती आणि त्याने 1000 कोटींपेक्षा अधिक कमाई करत बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवलं होतं. यानंतर दुसऱ्या भागाची तयारी जोरात सुरू असतानाच एक मोठा बदल समोर आला आहे. चित्रपटाच्या सिक्वेलमधून दीपिका पादुकोण (Deepika Padukone) हिला बाहेर काढण्यात आले आहे.
दीपिकाचा पत्ता का कट झाला?
सूत्रांनुसार, दीपिकाने निर्मात्यांकडे आपली फी वाढवण्याची मागणी केली होती आणि काही अतिरिक्त अटी घातल्या होत्या, ज्या निर्मात्यांना मान्य नव्हत्या. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला. दीपिकाचं (Deepika Padukone) पात्र चित्रपटाच्या स्टोरी मध्ये महत्त्वाचं असल्यामुळे तिच्या एक्झिटमुळे निर्मात्यांना दुसऱ्या पर्यायांचा शोध घ्यावा लागला आहे. पहिल्या भागात केवळ पात्रांची ओळख करून देण्यात आली होती, मात्र सिक्वेलमध्ये खऱ्या अर्थाने कथा उलगडणार आहे, त्यामुळे मुख्य अभिनेत्रीच्या निवडीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

या अभिनेत्रीचे नाव चर्चेत –
अशा वेळी आलिया भट्टचं नाव चर्चेत आलं आहे. एका रिपोर्टनुसार, दिग्दर्शक नाग अश्विन हे सध्या आलिया भट्टसोबत प्राथमिक चर्चा करत आहेत. सर्व गोष्टी सुरळीत झाल्यास, आलिया प्रथमच प्रभाससोबत काम करणार आहे. या चित्रपटात आधीच अमिताभ बच्चन, कमल हासन आणि दिशा पाटनी यांसारखे मोठे कलाकार सहभागी आहेत, त्यामुळे आलियाची एंट्री प्रेक्षकांसाठी एक नवा अनुभव ठरेल. दीपिकाच्या जागेसाठी याआधी कीर्ती सुरेश, अनुष्का शेट्टी यांसारख्या दक्षिण भारतीय अभिनेत्रींची नावं चर्चेत होती. मात्र आता आलियाचं नाव पुढे आल्याने उत्सुकता वाढली आहे. आलिया आणि दीपिका खाजगी आयुष्यात चांगल्या मैत्रिणी मानल्या जातात. दीपिका ही रणबीर कपूरची पूर्वप्रेमिका असून, आलिया त्याची पत्नी आहे. या पार्श्वभूमीवर आलिया दीपिकाचं पात्र साकारेल का, हे पाहणं रंजक ठरणार आहे.
आलिया भट्ट सध्या अनेक प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. डिसेंबर 2025 मध्ये तिचा ‘अल्फा’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे, ज्यात तिच्यासोबत शरवरी वाघ झळकणार आहे. त्यानंतर ती ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटात दिसणार असून त्याचे शूटिंग सुरू आहे. याशिवाय करण जोहरच्या आणखी एका चित्रपटातही तिच्या सहभागाची शक्यता आहे. अशा स्थितीत, ती ‘कल्कि 2898 AD’ च्या सिक्वेलमध्ये सामील होणार का, याकडे प्रेक्षक आणि चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले आहे.