साऊथ सिनेमांची लोकप्रियता गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढली आहे. चित्रपटांची कथा, दिग्दर्शन, अभिनय आणि संगीत या सर्व बाबींमध्ये साऊथ सिनेमांनी उच्च मानक प्रस्थापित केले आहे. यामुळे फक्त दक्षिण भारतातच नाही तर उत्तर भारत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रेक्षकांचे लक्ष वेधले गेले आहे. “बाहुबली”, “कंटू”, “आरआरआर” यांसारख्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवले आहे. OTT प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून साऊथ सिनेमे घरपोच प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहेत, अलीकडेच ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित झालेला मल्याळम चित्रपट ‘हृदयपूर्वम’ लवकरच ओटीटीवर पाहयात येणार आहे.
हृदयपूर्वम ओटीटीवर झळकणार!
अभिनेता मोहनलाल हे मल्याळम इंडस्ट्रीचे सुपरस्टार आहेत. त्यांच्या चित्रपटाची घोषणा होताच चाहत्यांमध्ये उत्साह संचारतो. ऑगस्टमध्ये प्रदर्शित झालेला त्यांचा चित्रपट ‘हृदयपूर्वम’ सध्या खूप चर्चेत आहे. २८ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट आता ओटीटीवर रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. ‘जियो हॉटस्टार’ने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर ‘हृदयपूर्वम’ २६ सप्टेंबरला रिलीज होणार असल्याचं जाहीर केलं आहे. ही बातमी ऐकून चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. एका चाहत्याने कमेंटमध्ये लिहिलं, “इतक्या लवकर? आता मजा येणार आहे!” ‘हृदयपूर्वम’चा एकूण खर्च फक्त ३० कोटी होता, पण या चित्रपटाने जगभरात ८० कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने भारतात ३२ कोटींपेक्षा जास्त कलेक्शन केलं आहे.
चित्रपटात नेमकं काय विशेष?
हा एक फॅमिली ड्रामा असून यात एक गोड प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. चित्रपटात मोहनलाल यांच्यासोबत सिद्दीकी, लालू ॲलेक्स आणि जनार्दन यांच्यासारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन सत्यन अंतिकादने केलं आहे. हिंदी चित्रपटसृष्टीप्रमाणेच आता साऊथ इंडस्ट्रीतील चित्रपटही जगभरात आपली जादू दाखवत आहेत. विशेषतः मल्याळम चित्रपट प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. साऊथ सिनेमांची देशभरातील वाढती लोकप्रियता हा अलीकडेच मोठा चिंतनाचा विषय आहे, सगळ्याचं दर्जेदार गोष्टींचा मेळ साधत दक्षिणेतील चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर सध्या राज्य करताना दिसत आहेत.












