गेल्या काही दिवसांत प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलेला सिनेमा म्हणजे कांतारा चॅप्टर १. आता हाच सिनेमा इंग्रजी भाषेतून जगभरातील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लवकरच या सिनेमाचे इंग्रजी डब्ड व्हर्जन जगभरात प्रदर्शित होणार आहे. अप्रतिम व्हिज्युअल्स, दमदार अभिनय आणि खोलवर जाऊन भिडणारी कथा यामुळे ‘कांतारा: चॅप्टर 1’ ला समीक्षक, चित्रपट निर्माते आणि प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक मिळत आहे. या सिनेमाचं यश फक्त भारतापुरतं मर्यादित न राहता, आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांमध्येही त्याने आपली छाप पाडली आहे आणि ग्लोबल मार्केटमध्ये मोठा प्रभाव पाडला आहे.
कांतारा चॅ.१ जगभरात प्रदर्शित होणार!
या अफाट यशाच्या पार्श्वभूमीवर, होम्बळे फिल्म्सने आता घोषणा केली आहे की ‘कांतारा: चॅप्टर 1’ चा इंग्रजी डब्ड व्हर्जन 31 ऑक्टोबर रोजी संपूर्ण जगभरात प्रदर्शित केला जाणार आहे. हा एक ऐतिहासिक टप्पा आहे, कारण ही भारताची पहिली अशी फिल्म ठरणार आहे जिचा इंग्रजी डब्ड थिएट्रिकल रिलीज संपूर्ण जगभरात होणार आहे. या ग्लोबल पायरीने ‘कांतारा: चॅप्टर 1’ एका खरी सांस्कृतिक घटना म्हणून पुढे येत आहे, जी भारतीय सिनेमा नवीन उंचीवर नेण्यास तयार आहे

कांताराची स्टोरी खरी की खोटी?
या चित्रपटातील कथा किती खरी आहे आणि किती कल्पना आहे, या प्रश्नावर रिषभ शेट्टीने उत्तर दिले. तो म्हणाला, “यातील कथा सत्य आणि कल्पनेचे मिश्रण आहे. आम्ही एक मायालोक दाखवला आहे. इतिहास आणि देवांच्या कथांना एकत्र गुंफून हा चित्रपट तयार केला आहे.” ‘कांतारा चॅप्टर १’ ने अवघ्या पाच दिवसांत जगभरात ३०० कोटींचा टप्पा पार करत पुन्हा एकदा ‘ब्लॉकबस्टर’ चित्रपट असल्याचे सिद्ध केले आहे. भारतातही या चित्रपटाने २५५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. ऋषभ शेट्टीनेच या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट २०२२ मध्ये आलेल्या ‘कांतारा’ चित्रपटाचा प्रीक्वल आहे.
कांतारा चॅप्टर १ चे कथानक नेमके काय?
कांतारा चॅप्टर १ हा मूळ ‘कांतारा २०२२’ चित्रपटाचा प्रीक्वेल आहे, म्हणजेच या भागात मूळ कथेला आधी काय घडले होते, त्याची पार्श्वभूमी दाखवली आहे. कथा प्राचीन काळातील कर्नाटकातील तटीय भागातल्या जंगलांनी वेढलेल्या गावात घडते. गावातील लोक निसर्ग आणि देव यांच्याशी घट्ट जोडलेले असून ते पण्जूरली देव आणि गुलीग देवता या जंगल देवतांची पूजा करतात. या देवतांच्या रक्षणाखाली गावकरी शांततेत जीवन जगत असतात. मात्र, एका लोभी राजाला त्या गावातील सुपीक जमीन हवी असते. सुरुवातीला तो ती जमीन गावकऱ्यांना दान देतो, पण नंतर लोभाने पछाडलेला राजा ती परत मिळवण्याचा प्रयत्न करतो.
या विश्वासघातामुळे देवतेचा कोप ओढवतो आणि त्यातूनच देव आणि माणूस यांच्यातील पवित्र कराराची सुरुवात होते. देव जमिनीचे आणि गावकऱ्यांचे रक्षण करेल, आणि लोक त्याची भक्तीपूर्वक सेवा करतील. या कथेत एक योद्धा उदयास येतो, जो देवतेच्या आशीर्वादाने गावाच्या रक्षणासाठी लढतो. त्याच्या माध्यमातून भूत कोला या पारंपरिक नृत्य-पूजेचा उगम आणि त्यामागील आध्यात्मिक अर्थ उलगडतो. कथानकात श्रद्धा, मानवी लोभ, सत्तेचा संघर्ष आणि निसर्गाशी माणसाचं नातं यांचा सुंदर संगम दिसतो. कांतारा चॅप्टर १ हे मूळ चित्रपटात दाखवलेल्या घटनांना गूढ, पौराणिक आणि भावनिक पार्श्वभूमी देतं आणि देव-मानव संबंधाचा गूढ तत्त्वज्ञानिक अर्थ स्पष्ट करतं.