काही दिवसांपूर्वीच ‘झी मराठी’ वाहिनीने ‘चला हवा येऊ द्या’च्या नव्या पर्वाची घोषणा केली. हा शो २६ जुलैपासून शनिवारी आणि रविवार रात्री नऊ वाजता प्रसारित केला जाणार आहे. आता या लोकप्रिय कार्यक्रमाला टक्कर देण्यासाठी ‘स्टार प्रवाह’वर ‘आपला सिद्धू’ नव्या जोमात पुनरागमन करणार आहे.
‘आता होऊ दे धिंगाणा’चा नवीन सीझन लवकरच
‘आता होऊ दे धिंगाणा’चा नवीन सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या आधीच्या तिन्ही पर्वांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. रोजच्या धकाधकीच्या जीवनात निखळ मनोरंजनाचे क्षण घेऊन येणारा हा कार्यक्रम फक्त महाराष्ट्रातच नाही तर सातासमुद्रापलीकडेही आवडीने पाहिला जातो. प्रेक्षकांचा हा लाडका कार्यक्रम चौपट मजा आणि चौपट धमाल घेऊन पुन्हा धिंगाणा घालण्यासाठी सज्ज झाला आहे.

सूत्रसंचालन सिद्धार्थ जाधवच करणार
चौथ्या पर्वाविषयी सांगताना सिद्धार्थ जाधव म्हणाला, “तुमचा कार्यक्रम कधी बंद होणार यापेक्षा तुमचा कार्यक्रम कधी सुरु होतोय याची जेव्हा प्रेक्षकांकडून विचारणा होते, तेव्हा तेच त्या कार्यक्रमाचं यश असतं. मी स्वप्नातही विचार केला नव्हता की इतकं यश आता होऊ दे धिंगाणाला मिळेल. या कार्यक्रमाचा चौथा सिझन करताना अतिशय आनंद आणि अभिमान वाटतोय. प्रेक्षकांप्रमाणेच मी सुद्धा या पर्वाची वाट पाहत होतो. आता होऊ दे धिंगाणा म्हणजे १००% मनोरंजनाची हमी. नव्या जोशात आणि नव्या ढंगात चौथं पर्व प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे.”
‘आता होऊ दे धिंगाणा’चं चौथं पर्व
येत्या 9 ऑगस्टपासून रात्री 9 वाजता ‘आता होऊ दे धिंगाणा’चं चौथं पर्व सुरु होत आहे. चौथ्या पर्वात प्रेक्षकांना थीमपार्कची जादू अनुभवता येणार आहे. थीमपार्कमध्ये ज्याप्रमाणे अद्भूत आणि अविश्वसनीय गोष्टींची सफर घडते, अगदी त्याप्रमाणेच धिंगाणाचा मंच भन्नाट गेम्सच्या माध्यमातून मनोरंजनाची धमाल सफर घडवणार आहे.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)