बॉलिवूडच्या स्टार कपल्सपैकी एक असलेलं कपल म्हणजे, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन. पण, गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडच्या या कपलमध्ये फारसं काही ठीक नसल्याच्या चर्चांना उधाण आलेलं. एवढंच नाहीतर, दोघंही लवकरच घटस्फोट घेणार असल्याचंही बोललं जात होतं. ऐश्वर्या रायसोबत घटस्फोटाच्या चर्चांवर अखेर अभिषेक बच्चनने मोकळी प्रतिक्रिया दिली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो ट्रोलिंगबद्दलही व्यक्त झाला. सोशल मीडियावर सतत होणाऱ्या चर्चांबद्दल अभिषेकने त्याचं परखड मत मांडलं आहे…
अभिषेक बच्चन घटस्फोटाच्या चर्चांवर पहिल्यांदाच बोलला
ई टाईम्सशी बोलताना,अभिषेक बच्चन म्हणाला की, तो बहुतेकदा त्याच्याबद्दल पसरणाऱ्या अफवांकडे दुर्लक्ष करतो, पण आता ही बाब त्याच्यासाठी अत्यंत चिंतादायक ठरतेय. कारण, जेव्हा तुम्ही बराच काळ एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करता, तेव्हा लोकांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू लागतो.

अशा अफवा खूप वेदनादायी असतात
अभिषेक बच्चन पुढे म्हणाला की, “अशा अफवा तुम्हाला खूप त्रास देतात. तुम्ही मला ओळखत नाही, तुम्हाला माझ्या आयुष्याबद्दल काहीच माहिती नाही, पण तरीही तुम्ही एका कम्प्युटरच्या मागे बसून एखाद्यासाठी काहीही वाईट लिहिणं योग्य नाही, त्यामुळे समोरच्या व्यक्तीला त्रास होऊ शकतो. अफवा लहान असो वा मोठी, त्याचा तुमच्या आयुष्यावर परिणाम होतो. अभिनेता म्हणतो की, अशा बातम्यांचा फक्त माझ्यावरच नाही तर माझ्या कुटुंबावरही परिणाम झाला आहे.” तसेच, पुढे बोलताना अभिषेक बच्चननं प्रश्न विचारला आहे. अभिषेक म्हणतो की, जर कोणी तुमच्यासोबत असं केलं तर तुम्हाला कसं वाटेल?
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)