‘लपंडाव’ मालिकेतून अभिनेत्री कृतिका देवच मालिका विश्वात पदार्पण

Asavari Khedekar Burumbadkar

स्टार प्रवाह वरील नवी मालिका सध्या प्रचंड चर्चेत आहे. लपंडाव ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेत्री रुपाली भोसले पुन्हा एकदा आई कुठे काय करते मालिकेनंतर स्टार प्रवाह सोबत काम करत आहे. त्याच मालिकेतील यशची भूमिका साकारणारा अभिनेता अभिषेक देशमुखची पत्नी लवकरच मालिकाविश्वात पदार्पण करणार आहे. ‘लपंडाव’ या मालिकेत ती महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवर सुरु होणाऱ्या ‘लपंडाव’ मालिकेतून कृतिका मालिका विश्वात दमदार पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. या मालिकेत ती सखी कामत हे पात्र साकारणार आहे. कृतिका देवची ‘लपंडाव’ ही पहिलीवहिली मालिका आहे. आयुष्यातली पहिली गोष्ट ही नेहमी खास असते. त्यामुळे या मालिकेसाठी ती खूपच उत्सुक आहे. कृतिका ही ‘राजवाडे अँड सन्स’ या चित्रपटातून प्रसिद्धीझोतात आली. ती अभिनेता अभिषेक देशमुखची पत्नी आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अभिषेकने अरुंधतीच्या धाकट्या मुलाची भूमिका साकारली होती. ‘हॅपी जर्नी’, ‘हवाईजादा’ यांसारख्या चित्रपटांमध्येही कृतिकाने भूमिका साकारल्या आहेत.

सखी कामत या भूमिकेत दिसणार कृतिका देव

”‘स्टार प्रवाहसोबतचा माझा पहिला प्रोजेक्ट आहे. त्यामुळे प्रचंड उत्सुकता आहे. मी स्वत:ला खूप भाग्यवान समजते की इतकं छान पात्र साकारण्याची संधी मला मिळाली. सखी कामत अतिशय श्रीमंत घरातली मुलगी आहे. सगळी सुखं तिच्या पायाशी आहेत मात्र आईच्या प्रेमासाठी ती आसुसलेली आहे. सखीच्या मनातली घालमेल नेमकी काय असेल हे साकारण्याचा माझा प्रयत्न असेल. मालिकेची टीम खूपच छान आहे. प्रेक्षकांना ही मालिका नक्की आवडेल.”

 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

ताज्या बातम्या