रितेश देशमुखवर बिग बॉस फेम रिलस्टार पुनीत सुपरस्टारची टीका

Asavari Khedekar Burumbadkar

गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात हिंदी-मराठी वाद सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. शाळांमध्ये पहिलीपासूनच हिंदी सक्तीचा निर्णय घेण्यात आल्यानंतर हा मुद्दा चर्चेत आला. या निर्णयावर राजकीय तसंच मनोरंजन क्षेत्रातील अनेकांकडून विरोध झाला. त्यानंतर सरकारकडून हिंदी सक्तीचे दोन्ही जीआर रद्द करण्यात आले. यानंतरही मराठी-हिंदी भाषेवरून विविध प्रतिक्रिया समोर आल्या. या पार्श्वभूमीवर, सोशल मीडियावर रितेश देशमुखचा एक व्हिडीओ व्हायरल झाला, ज्यामध्ये तो एका व्यक्तीला मराठीत बोलण्यास सांगताना दिसतो. याच व्हिडीओवर रील्स स्टार पुनीत सुपरस्टारने रितेश देशमुखवर मराठी भाषेच्या मुद्द्यावरून जोरदार टीका केली आहे.

काय म्हणाला बिग बॉस फेम रिलस्टार?

पुनीत सुपरस्टार त्याच्या विचित्र आणि आगळ्यावेगळ्या व्हिडीओंमुळे नेहमीच चर्चेत असतो. अशातच त्याने सोशल मीडियावर रितेश देशमुखचा एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये रितेश एका पापाराझी व्यक्तीशी बोलताना दिसतो, ज्याला तो विचारतो, “मराठी की हिंदी? दोन्ही येतात?” त्यावर समोरची व्यक्ती हसत “हा हा” असं उत्तर देते. यावर प्रतिक्रिया देताना पुनीत म्हणतो, “हा दीड दमडीचा अभिनेता रितेश देशमुख, आता म्हातारा होत चालला आहे. पत्रकार त्याला प्रश्न विचारतात, तेव्हा तो म्हणतो, हिंदीत बोलायचं की मराठीत? आणि जेव्हा तो हिंदीत बोलतो, तेव्हा रितेश त्याला नकार देतो.” पुनीत पुढे म्हणतो, “तू मला एक सांग, तुझ्या हिंदुस्तानात आणि मुंबईत कोट्यवधी लोक आहेत, जे मराठी नाहीत. त्यात तुला बंगाली, मुस्लिम, गुजराती, बिहारी असे सगळे भेटतील. तू हिंदी भाषेचा अपमान का करतोस? तू मराठी भाषेचं समर्थन करतोस, हे ठीक आहे. आम्हीही मराठीला पाठिंबा देतो. पण कोणी तुझ्याशी हिंदीत बोलत असेल, तर त्याचा अपमान करण्याचा तुला अधिकार कोणी दिला? आणि तुला स्वतःला तरी मराठी किती येतं? तू स्वतः इंग्रजी शाळेत शिकला आहेस आणि तुझं लग्न ख्रिश्चन महिलेशी झालंय.”

कोण आहे पुनीत सुपरस्टार 

पुनीत सुपरस्टार हा एक रिलस्टार आहे. त्याचे रिल्स हे कायमच विचित्र असतात. तो ‘बिग बॉस ओटीटी’मध्येही सहभागी झाला होता, पण पहिल्याच दिवशी त्याला शोमधून बाहेर काढण्यात आले. सध्या तो मराठी विरुद्ध हिंदी भाषेच्या वादात चर्चेत आहे. त्याने रितेश देशमुखवर मराठी भाषेवरुन टीका केली होती. यानंतर, अनेक मराठी कलाकारांनी आणि चाहत्यांनी त्याच्यावर जोरदार टीका केली. पुनीतचा रितेश देशमुखवर टीका करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. त्यानंतर आता त्याने तो काढून टाकला आहे. 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

ताज्या बातम्या