त्रिभाषा सूत्रानुसार राज्यात हिंदीची सक्ती आणि मराठी भाषेच्या मुद्द्यावरून राज्यात वाद सुरू आहे. या वादात आता हिंदी तसंच मराठी सिनेसृष्टीतील कलाकार व्यक्त होताना दिसत आहेत. अनेक कलाकारांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त दिल्या आहेत. आता अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी देखील या वादावर भाष्य केलंय.
रेणुका शहाणेंची प्रतिक्रिया
‘इनकंट्रोव्हर्शियल विथ पूजा चौधरी’ पॉडकास्टमध्ये रेणुका म्हणाल्या, “जर तुम्ही बऱ्याच काळापासून एखाद्या ठिकाणी राहत असाल, तर स्थानिक भाषा, संस्कृती समजून घेणं आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्याविषयी आदर बाळगणं ही चांगली गोष्ट आहे. ती भाषा बोलता येण्याचा मुद्दा नाही, पण ती शिकून घेण्याची इच्छा आणि त्याचा आदर करणं महत्त्वाचं आहे. मला असे लोक आवडत नाहीत, ज्यांना स्थानिक भाषा आणि स्थानिक संस्कृतीला सामावून घेण्याची आवश्यकता वाटत नाही.”

भाषेवरून हिंसाचार नको
मीरा रोडमध्ये मराठी बोलण्यावरून एका रेस्टॉरंटच्या मालकाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना त्या पुढे म्हणाल्या, “मला हिंसाचार अजिबात आवडत नाही. लोकांचं असभ्य वागणं मला आवडत नाही. जिथे मराठी बोलली जात नाही, अशा ठिकाणी जाऊन दोन-तीन लोकांच्या कानाखाली मारल्याने त्याचा भाषेला काहीही फायदा होणार नाही. आपल्याला ती भाषा लोकांपर्यंत अशा प्रकारे पोहोचवण्याचे मार्ग शोधावे लागतील, की लोकांना ती सोयीची वाटेल आणि ते आनंदाने त्याचा स्वीकार करतील. भाषा ही काही बळजबरीने लादण्याची गोष्ट नाही. म्हणूनच मी महाराष्ट्रात अगदी लहानपणापासूनच हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात होते. मला वाटतं की ती एक निवड असावी, जी मीसुद्धा लहानपणी केली होती.”
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)