दशावतार चित्रपट 12 सप्टेंबरला रिलीज झाला. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत दमदार ओपनिंग केली आहे. रिलीजच्या फक्त 3 दिवसांत सिनेमानं बजेट वसूल केलं आहे. सर्वत्र प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून थिएटरमध्ये ‘दशावतार’ची जादू अनुभवण्यासाठी गर्दी उसळली आहे. दमदार कथा, तगडी स्टारकास्ट आणि उत्कृष्ट दिग्दर्शन यामुळे ‘दशावतार’ सिनेमाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
दशावतारची जोरदार कमाई, बजेट वसूल
खरंतर दशावतार सिनेमाने सिनेमाने पहिल्याच दिवशी 58 लाखांची कमाई केली. दुसऱ्या दिवशी या आकड्यात मोठी उडी घेत सिनेमाने 1.39 कोटींची कमाई केली. तिसऱ्या दिवशीही सिनेमाने चांगली कामगिरी केली. सिनेमानं तीन दिवसात 5.22 कोटींची कमाई केली आहे. पहिल्याच आठवड्यात सिनेमानं बजेट वसूल केलं आहे.

दशावतार चित्रपटाचे कथानक नेमके काय?
कोकणातील पारंपरिक लोककला आणि त्याचं मर्म समजून घेत त्या माध्यमातून कोकणातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करण्याचा प्रामाणिक प्रयत्न दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी केला आहे. बाप-लेकाच्या प्रेमापासून सुरू झालेली ही कथा कोकणात विकासाच्या नावाखाली निसर्गाचा नाश करू पाहणाऱ्यांच्या विरोधात संघर्ष उभा करणाऱ्या गावकऱ्यांपर्यंत येऊन पोहोचते. ही अनोखी कलाकृती मराठीसह इतर भाषिक प्रेक्षकांनाही भावली आहे.
चित्रपटाची मांडणी करताना कोकणातील जंगलं, कातळशिल्प, नदी, मंदिरं आणि तिथं रंगणारा दशावतार या सगळ्यांचा दिग्दर्शकाने सुंदर वापर करून घेतला आहे. या चित्रपटातील दृश्ये कुठेही कृत्रिम वाटणार नाही, इतक्या सुंदर पद्धतीने सिनेमॅटोग्राफ देवेंद्र गोलतकर यांनी सर्वकाही टिपलं आहे. कोकणातील घनदाट जंगलात अनुभवायला मिळणारी गूढता, शांतता जशाच्या तशा पोहोचवण्यासाठी तांत्रिक बाबींवर प्रचंड मेहनत घेतलेली दिसून येते. आगामी काही दिवसांत चित्रपटाला प्रेक्षकांची मिळणारी पसंती वाढताना दिसेल, असा जाणकारांचा अंदाज आहे.











