ग्रामीण भागातील मुलांच्या लग्नाचा गंभीर विषय मांडणारा ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ चित्रपट; 19 सप्टेंबरपासून सिनेमागृहात

'कुर्ला टू वेंगुर्ला' या चित्रपटातून प्रेक्षकांना सहकुटुंब पुरेपूर मनोरंजन अनुभवता येणार आहे. गावातील तरुणांच्या न होणाऱ्या लग्नाचा विषय हलक्याफुलक्या पद्धतीने मांडण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील ग्रामीण भागात शेतकरी आणि नोकरदार मुलांच्या लग्नाचा विषयही गंभीर बनला आहे. ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांना मुलांच्या योग्य विवाहासाठी मोठ्या खर्चाला सामोरे जावे लागते. शेतकरी मुलांच्या बाबतीत शेतीवर अवलंबित्व, उत्पन्नातील अनिश्चितता आणि दुष्काळासारख्या समस्या विवाहासाठी अडथळा ठरतात. दुसरीकडे नोकरदार मुलांचे विवाह ठरवताना स्थिर नोकरी, पगार आणि सामाजिक प्रतिष्ठेला जास्त महत्त्व दिले जाते. त्यामुळे हुंडा प्रथा, मोठ्या थाटामाटाने लग्न करणे, तसेच मुलांच्या शिक्षणाचा आणि करिअरचा विचार बाजूला पडतो. या सर्वांमुळे शेतकरी आणि नोकरदार कुटुंबांवर आर्थिक ओझे वाढते. यामुळे अनेक गंभीर अशा स्वरूपाचे प्रश्न यामुळे निर्माण झाले आहेत. हेच वास्तव मराठी चित्रपट कुर्ला टू वेंगुर्लामधून दाखविण्यात येणार आहे.

कुर्ला टू वेंगुर्ला 19 सप्टेंबरपासून मोठ्या पडद्यावर

‘कुर्ला टू वेंगुर्ला’ या चित्रपटातून प्रेक्षकांना सहकुटुंब पुरेपूर मनोरंजन अनुभवता येणार आहे. गावातील तरुणांच्या न होणाऱ्या लग्नाचा विषय हलक्याफुलक्या पद्धतीने मांडण्यात आला असून, उत्तमोत्तम कलाकार असलेल्या या चित्रपटात मालवणी बोलीचाही तडका आहे. विजय कलमकर दिग्दर्शित या चित्रपटाची चित्रपटसृष्टीत चर्चा असून,  19 सप्टेंबर रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

ग्रामीण भागातील मुलांच्या लग्नाचा प्रश्न पडद्यावर

सध्या राज्यभरातील ग्रामीण भागात मुलांची लग्न जमणे ही समस्या झाली आहे. गावातल्या मुलींना शहराचे आकर्षण असते, त्यांच्याही आयुष्याबद्दल काही इच्छा-आकांक्षा असतात. परिणामी शहर आणि ग्रामीण भाग अशी एक दरी निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांच्या रखडणाऱ्या लग्नाचा संवेदनशील विषय, त्याच्याशी जोडलेले सामाजिक मुद्दे, परस्पर नातेसंबंध अशा विषयाची मांडणी कुर्ला टू वेंगुर्ला या चित्रपटात करण्यात आली आहे. गंभीर विषयाची अत्यंत मनोरंजक पद्धतीने हाताळणी या चित्रपटात करण्यात आली आहे. त्यामुळे सहकुटुंब चित्रपटगृहात अनुभवावा असा हा चित्रपट आहे. आतापर्यंत टीजर, ट्रेलरने चित्रपटाविषयी उत्सुकता वाढवली आहे.

त्यामुळे सिनेमागृहातही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सिने कथा कीर्तन, चंद्रभागा स्टुडिओज आणि एम व्ही शरतचंद्र  यांनी ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अमरजीत आमले, विजय कलमकर, चारुदत्त सोमण, नयना सोनावणे, अविनाश सोनावणे, एम. व्ही. शरतचंद्र हे या  चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लेखन अमरजीत आमले यांनी, तर दिग्दर्शन विजय कलमकर यांनी केलं आहे. अभिनेते वीणा जामकर, प्रल्हाद कुडतरकर, वैभव मांगले, सुनील तावडे, स्वानंदी टिकेकर, साईंकित कामत अशी उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News