लग्नाच्या दोन वर्षांनंतर परिणीती चोप्रा-राघव चड्ढांची चाहत्यांसाठी गुडन्यूज; आई-बाबा होणार असल्याची दिली माहिती

Rohit Shinde

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राची एक इन्स्टाग्राम पोस्ट सध्या जाम चर्चेत आहे. ज्यामध्ये, परिणीतीने इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये एक खास केक दिसत आहे. या केकवर चिमुकल्या पावलांच्या खुणा आहेत आणि त्यावर लिहिलंय की, “1+1=3’… अशा पद्धतीनं हटके पोस्ट शेअर करुन परिणीतीनं गूड न्यूज शेअर केली आहे. त्यामुळे परिणीती चौप्रा प्रेग्नंट असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. यावर चाहत्यांकडून देखील तुफान प्रतिक्रिया समोर येताना दिसत आहेत.

परिणीती-राघव आई-बाबा होणार!

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रानं चाहत्यांसोबत गूड न्यूज शेअर केली आहे. अलिकडेच तिनं सोशल मीडियावर चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे. लग्नाच्या दोन वर्षांनी राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा आता आई-बाबा होणार आहेत. यासंदर्बात परिणीतीनं सोशल मीडियावर एक क्युट पोस्ट शेअर केली आहे.

परिणीतीनं तिच्या पोस्टसोबत एक व्हिडीओही पोस्ट शेअर केला आहे. ज्यामध्ये ती तिचा पती राघव चड्ढासोबत परदेशात फिरताना दिसतेय. दोघेही एकमेकांमध्ये पुरते हरवल्याचं पाहायला मिळत आहे. हात धरून चालताना दिसत आहेत. या पोस्टसोबत तिने कॅप्शन लिहिलंय की, “हमारी छोटी सी दुनिया रास्ते में है… बेहिसाब रूप से धन्य महसूस कर रही हूं….” त्यामुळे ही गुडन्यूज कन्फर्म झाली आहे. एवढं मात्र नक्की.

चाहत्यांकडून भरभरून शुभेच्छा!

परिणीती आणि राघव यांनी त्यांच्या गरोदरपणाची घोषणा करताच, त्यांच्या चाहत्यांनी आणि अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये त्यांचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली. या आनंदाच्या बातमीसाठी जोडप्याचं अभिनंदन करताना सोनम कपूरने लिहिलंय की, “अभिनंदन डार्लिंग” तर अनन्या पांडेनं लिहिलंय की, “ओह… अभिनंदन परी” याशिवाय, इतर अनेक सेलिब्रिटींनी या जोडप्याचं अभिनंदन केलंय.

परिणीती आणि राघव चड्ढाचे नाते

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचे नाते हे अलीकडच्या काळातील चर्चेचा विषय ठरले आहे. परिणीती ही लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री असून राघव चड्ढा हे आम आदमी पक्षाचे तरुण नेते आणि खासदार आहेत. दोघांनी दीर्घकाळ एकमेकांना ओळखल्यानंतर त्यांच्या नात्याला अधिकृत स्वरूप दिले होते. त्यानंतर आता हे दोघे आई-बाबा होणार असल्याची माहिती समोर येत आहे.चाहत्यांनी आणि राजकीय व सिनेसृष्टीतील अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. परिणीती आणि राघव यांची जोडी ही प्रेम, समजूतदारपणा आणि परस्पर आदराचे प्रतीक मानली जाते. त्यांच्या नात्यामुळे चाहत्यांमध्ये आनंद आणि उत्सुकता अधिक वाढली आहे.

ताज्या बातम्या