कॅन्सरशी झुंज देत असलेल्या अभिनेत्री हिना खाननं गुपचूप उरकलं लग्न, सुंदर फोटो व्हायरल

Jitendra bhatavdekar

कॅन्सरशी झुंज देत असलेल्या टीव्ही अभिनेत्री हिना खान हिनं गुपचूप लग्न केलं आहे. रॉकी जायसवालला अनेक वर्षांपासून डेट करत असलेल्या हिनानं सोशल मीडियावर तिच्या रजिस्टर्ड लग्नाच्या फोटोस शेअर करत सगळ्यांना आश्चर्यचकित केलं आहे. तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तिनं कोणताही गाजावाजा न करता अत्यंत साधेपणाने लग्न केलं असून, हे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत.

37 वर्षांची हिना खान हिनं रॉकी जायसवालला आपला जोडीदार म्हणून स्वीकारलं आहे. त्यांच्या लग्नाची कुणालाही कल्पनाही नव्हती. 4 जून 2025 रोजी हिनानं इंस्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर केले आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला. मात्र सगळे तिच्या या निर्णयावर खूश असून तिला शुभेच्छा देत आहेत.

हिनानं रॉकीसोबतचे फोटो शेअर करत भावनिक संदेश लिहिला

“दोन वेगवेगळ्या विश्वांमधून आलो असलो, तरी आम्ही एक प्रेमाचं ब्रह्मांड निर्माण केलं. आमचे मतभेद नाहीसे झाले, आमची हृदयं एक झाली आणि असं एक नातं तयार झालं जे आयुष्यभर टिकणार आहे. आम्ही एकमेकांचे घर, प्रकाश आणि आशा आहोत आणि एकत्र येऊन सर्व अडथळे पार करत आहोत. आज आमचं एकत्र येणं प्रेमात आणि कायद्यानुसार कायमचं सील झालं आहे. आम्ही पती-पत्नी म्हणून तुमचं आशीर्वाद आणि शुभेच्छा मागतो.”

ये रिश्ता क्या कहलाता है मधून लोकप्रिय झाली

श्रीनगरची रहिवासी असलेली हिना ही एक काश्मिरी मुस्लिम आहे. तिने MBA केले आहे. तिचा पहिला मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ होता आणि यामध्ये अक्षरा म्हणून तिनं प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. याच शोमध्ये रॉकी जायसवालही होता. तो सुपरव्हायझिंग प्रोड्यूसर म्हणून काम करत होता. इथूनच हिना आणि रॉकीची प्रेमकहाणी सुरू झाली.

हिना आणि रॉकीनं 2014 साली एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती आणि त्यांचं नातं जवळपास 11 वर्षांचं आहे. हिनानं ‘बिग बॉस 11’ मध्ये सगळ्यांसमोर रॉकीबद्दल सांगितलं आणि त्यांच्या रिलेशनशिपचं उघडपणे कबुल केलं.

हिना सध्या ब्रेस्ट कॅन्सरशी झुंजत आहे

गेल्या काही महिन्यांपासून हिना ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देत आहे. तिच्या अनेक केमोथेरपी झाल्या आहेत. ती सोशल मीडियावरून तिच्या फॅन्सना नियमित अपडेट देत असते. सध्या ती बर्‍याच अंशी बरी आहे. आणि अशा काळात तिनं लग्न करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

ताज्या बातम्या