बॉलीवूडमधील सर्वात देखण्या आणि लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक असलेल्या हृतिक रोशनने (Hrithik Roshan) आपल्या कारकिर्दीत विविध भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ‘ग्रीक गॉड’ अशी उपाधी लाभलेला हा अभिनेता आता एका नव्या रूपात चाहत्यांसमोर येण्यास सज्ज झाला आहे. मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयकौशल्याने चाहत्यांना भुरळ घालणारा हृतिक आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर निर्माता म्हणून पदार्पण करत आहे. हृतिक रोशनने आपल्या प्रोडक्शन हाऊस HRX Filmsच्या माध्यमातून ‘स्टॉर्म’ या मालिकेची निर्मिती हाती घेतली आहे. ही सिरीज प्राइम व्हिडिओ या आघाडीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हृतिकसोबत त्याचा भाऊ ईशान रोशन देखील या प्रोजेक्टमध्ये सहनिर्माता म्हणून सहभागी आहे. हा प्रोजेक्ट केवळ हृतिकच्या चाहत्यांसाठीच नाही, तर थरारक आणि वास्तववादी कथा पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी देखील एक मोठी पर्वणी ठरणार आहे.
कोणी केलं दिग्दर्शन? Hrithik Roshan
या सीरिजचे दिग्दर्शन अजितपाल सिंग यांनी केलं असून, कथा त्यांनी फ्रान्स्वा लुनेल आणि स्वाती दास यांच्या सहकार्याने लिहिली आहे. ‘स्टॉर्म’ ही मालिका मुंबईच्या पार्श्वभूमीवर घडणारी एक भावनात्मक आणि थरारक कथा आहे, जी शहराच्या गुंतागुंतीच्या वास्तवाला, मानवी नातेसंबंधांच्या धाग्यांना आणि संघर्षशील जीवनशैलीला स्पर्श करते. या सिरीज मध्ये पार्वती थिरुवोथू, अलाया एफ, सृष्टी श्रीवास्तव, रमा शर्मा आणि सबा आझाद यांसारख्या गुणी कलाकारांचा समावेश आहे. त्यांच्या अभिनयामुळे मालिकेला अधिक सखोलता आणि प्रामाणिकपणा मिळण्याची अपेक्षा आहे.

काय म्हणाला हृतिक?
या नव्या प्रवासाबद्दल हृतिकने (Hrithik Roshan) म्हंटल, ‘स्टॉर्म’ ही सिरीज माझ्यासाठी एक नवीन टप्पा आहे. निर्माता म्हणून काम करणं ही माझ्या कलात्मक प्रवासातील एक महत्त्वाची पायरी आहे. अजितपाल सिंग यांनी साकारलेलं वास्तववादी आणि भावनांनी भरलेलं जग मला अतिशय भावलं. या कथेतील पात्रं, त्यांचा संघर्ष, त्यातील प्रामाणिक भावना हे सगळं मला या प्रोजेक्टकडे ओढून घेणारं ठरलं.”
हृतिक रोशनसारखा मोठा स्टार जेव्हा निर्माता म्हणून ओटीटी माध्यमात प्रवेश करतो, तेव्हा अपेक्षा नक्कीच उंचावतात. ‘स्टॉर्म’ ही मालिका केवळ एका सेलिब्रिटीच्या नावावर नाही, तर तिच्या सशक्त कथानकावर आणि दर्जेदार निर्मितीमूल्यावर उभी राहते. त्यामुळे प्रेक्षक आणि चाहते आता हृतिकच्या या नव्या भूमिकेतील कामगिरीकडे उत्सुकतेने पाहत आहेत. प्रेक्षकांसाठी ही मालिका केवळ मनोरंजनाचे साधन न राहता, सामाजिक वास्तव आणि मानवी भावभावनांचा आरसा ठरण्याची शक्यता आहे. ‘स्टॉर्म’ कधी प्रदर्शित होणार, याची अधिकृत घोषणा अद्याप व्हायची आहे, मात्र हृतिकच्या चाहत्यांसाठी हा एक मोठा सरप्राइज ठरतोय, यात शंका नाही.











