‘कांतारा’ या ब्लॉकबस्टर सिनेमाने प्रेक्षकांच्या मनात जे स्थान निर्माण केलं, ते अधिक भक्कम करत ऋषभ शेट्टी आता ‘कांतारा: चैप्टर 1’ घेऊन पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या बहुप्रतिक्षित प्रीक्वलचा दमदार ट्रेलर (Kantara Chapter 1 Trailer) नुकताच प्रदर्शित झाला असून, सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे.
ट्रेलरमध्ये काय आहे खास? Kantara Chapter 1 Trailer
‘कांतारा: चैप्टर 1’ या चित्रपटात ऋषभ शेट्टी यांचे पूर्वज आणि दैवी शक्ती यांची गोष्ट मांडली जाणार आहे. ट्रेलरमध्ये वापरलेलं भव्य VFX, जोरदार पार्श्वसंगीत आणि अंगावर काटे आणणाऱ्या दृश्यांमुळे प्रेक्षक भारावून गेले आहेत. चित्रपटात जंगलातील प्राचीन कथा, भव्य लोकेशन्स, आणि ऋषभ शेट्टीचा अॅक्शन अवतार यामुळे ट्रेलरला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरचे अनेक भाषांमध्ये अनावरण करण्यात आले आहे. हिंदी ट्रेलर अभिनेता ऋतिक रोशनने, मलयाळम ट्रेलर पृथ्वीराज सुकुमारनने, तेलुगू ट्रेलर प्रभासने आणि तमिळ ट्रेलर शिवकार्तिकेयनने लॉन्च केला आहे.

प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सोशल मीडियावर ट्रेलरला प्रचंड प्रतिसाद मिळत असून, युजर्सनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, “दैव परत आलं आहे”, “२ ऑक्टोबरला इतिहास रचला जाईल”, आणि “भारतीय चित्रपटसृष्टीला ग्लोबल स्टेजवर नेणारा सिनेमा ठरेल.” काहींनी या चित्रपटाची तुलना ‘बाहुबली २’ शी केली असून, काहींनी या चित्रपटाचे कलेक्शन २००० कोटींपर्यंत जाईल, असा अंदाज वर्तवला आहे.
कलाकार आणि निर्मिती
‘कांतारा: चैप्टर 1’ (Kantara Chapter 1 Trailer) या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वत: ऋषभ शेट्टी यांनी केले आहे. या चित्रपटात ऋषभ शेट्टीसोबत सप्तमी गौडा, जयराम, रुक्मिणी वसंत, आणि गुलशन देवैया यांसारखे कलाकार झळकणार आहेत. हा चित्रपट २ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार असून, अंदाजे १२५ कोटी रुपयांच्या भव्य बजेटवर तो तयार केला जात आहे.
‘कांतारा’चा इतिहास
याआधी ‘कांतारा’ हा चित्रपट केवळ १६ कोटींच्या बजेटमध्ये तयार झाला होता. २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने वर्ल्डवाइड ४०० कोटींपेक्षा अधिक कमाई करत बॉक्स ऑफिसवर विक्रमी यश मिळवलं होतं. त्याचे संगीत, अभिनय, पटकथा आणि दिग्दर्शन सर्वच बाबतीत तो चित्रपट लक्षवेधी ठरला होता. आता प्रेक्षकांच्या मनात एकच प्रश्न आहे ‘कांतारा’ने ज्या कमाल लहान बजेटमध्ये करून दाखवली, तीच जादू ‘कांतारा: चैप्टर 1’ मोठ्या बजेटमध्ये टिकवून ठेवू शकेल का?