KBC मध्ये 10 वर्षांच्या मुलाचा बिग बी यांच्यासमोर उद्धटपणा ; प्रेक्षक संतापून म्हणाले, आईवडिलांनी काहीच…

Asavari Khedekar Burumbadkar

‘कौन बनेगा करोड़पति’ या लोकप्रिय टीव्ही शोच्या १७व्या पर्वात नुकतीच एक घटना घडली आहे, जिची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. गुजरातमधील इशित भट्ट नावाचा १० वर्षांचा मुलगा शोमध्ये सहभागी झाला होता. इशित हा पाचवीत शिकणारा विद्यार्थी असून तो ‘हॉट सीट’वर बसला असताना त्याने अमिताभ बच्चन यांच्याशी ज्या पद्धतीने संवाद साधला, त्यामुळे प्रेक्षक आणि सोशल मीडिया युजर्स आश्चर्यचकित झाले. काही जणांनी त्याचा आत्मविश्वास कौतुकास्पद म्हटला, तर बहुसंख्य प्रेक्षकांनी त्याच्या वागण्यावर नाराजी व्यक्त केली.

नेमकं काय घडलं?

शोच्या सुरुवातीसच इशितने अमिताभ बच्चन यांना सांगितले की, “मला रूल्स माहीत आहेत, त्यामुळे तुम्ही ते सांगू नका.” त्यानंतर त्याने सुरुवातीचे चार प्रश्न कोणतेही पर्याय न मागता उत्तर देण्याचा आग्रह धरला. एका प्रश्नाच्या वेळी बच्चन यांना मध्येच थांबवत तो म्हणाला, “ऑप्शन नकोय, डान्स लॉक करा.” पुढच्या प्रश्नात तो म्हणाला, “सर, तुम्ही प्रश्न तरी विचारा.” या संवादामुळे इशितचा आत्मविश्वास दिसून आला, मात्र त्याचा संवादाचा ढंग अनेकांना उद्धट वाटला. प्रेक्षकांना त्याचे वागणे थोडक्यात अति आत्मविश्वासाचे आणि असभ्य वाटले.

रामायणावर आधारित पाचवा प्रश्न त्याच्याकडे आला, ज्यामध्ये तो २५,००० रुपये जिंकू शकला असता. यावेळी त्याने चार पर्याय मागितले आणि आत्मविश्वासाने ‘B’ पर्याय निवडला. मात्र त्याचे उत्तर चुकीचे ठरले आणि त्यामुळे तो कोणतेही बक्षीस न जिंकता शोमधून बाहेर पडला. या संपूर्ण प्रसंगावर सोशल मीडियावर प्रचंड प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेक युजर्सनी इशितच्या वागणुकीवर टीका करताना त्याच्या पालकांनाही जबाबदार धरले. काही युजर्सनी लिहिले की अशा प्रकारचा गर्विष्ठपणा लहान वयात येणे हे बहुतांश वेळा पालकांच्या चुकीच्या प्रोत्साहनामुळेच असते. काही जणांनी तर म्हटले की पालक त्याच्या वागणुकीवर गर्व करत होते, जे लज्जास्पद आहे.

बोलण्यात नम्रता हवी –

अनेकांनी असेही मत व्यक्त केले की मुलांमध्ये फक्त ज्ञान असणे पुरेसे नाही, तर नम्रता, शिस्त, शिष्टाचार आणि संयम यांचे शिक्षण देणे तितकेच महत्त्वाचे आहे. जर मुले वडीलधाऱ्यांशी योग्य रितीने बोलणं शिकली नाहीत, तर त्यांच्या यशात अडथळे निर्माण होऊ शकतात. ही घटना पालकांसाठी एक प्रकारची शिकवण ठरू शकते. लहान वयात आत्मविश्वास असावा, पण तो नम्रतेच्या चौकटीत असावा, हे महत्त्वाचे आहे. अन्यथा, ज्ञान असूनही अशी मुले समाजात चुकीच्या अर्थाने लक्ष वेधून घेतात.

ताज्या बातम्या