Mahesh Manjrekar : मुंबईत शिवाजी पार्कमध्ये पण मराठी माणूस उरला नाही; महेश मांजरेकरांची खंत

मुंबईत मराठीसाठी जपलेले काही भाग आता उरलेच नाहीत. काहीसं पुणे आणि मुलुंड भागात टिकून आहे. पण शिवाजी पार्कसारख्या मराठी ओळखीच्या जागाही आता बदलत चालल्या आहेत.

राज्याच्या राजधानीत मराठी भाषकांचे प्रमाण दिवसेंदिवस घटत चालल्याची खंत अभिनेते – दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी नुकत्याच एका पुरस्कार सोहळ्यात व्यक्त केली. शिवसेना- मनसेच्या राजकीय केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या शिवाजी पार्क परिसरातदेखील आता “मराठी माणूस उरलेला नाही,” असे मनापासून सांगताना त्यांच्या बोलण्यातून मराठी अस्मितेबाबतची जिव्हाळ्याची भावना स्पष्टपणे उमटत होती.

मांजरेकर नेमकं काय म्हणाले? Mahesh Manjrekar

मुलुंडमध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या ११व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मांजरेकर यांना “कमल शेडगे ज्येष्ठ रंगकर्मी पुरस्कार” प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमातच त्यांनी मुंबईतील मराठी लोकसंख्येच्या झपाट्याने घटत चाललेल्या प्रमाणावर भाष्य करत आपली व्यथा मांडली. “मुंबईत मराठीसाठी जपलेले काही भाग आता उरलेच नाहीत. काहीसं पुणे आणि मुलुंड भागात टिकून आहे. पण शिवाजी पार्कसारख्या मराठी ओळखीच्या जागाही आता बदलत चालल्या आहेत,” असे त्यांनी (Mahesh Manjrekar) सांगितले. हे विधान केवळ सांस्कृतिक नाही तर सामाजिक आणि राजकीयदृष्ट्याही महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

महेश मांजरेकर प्रसिद्ध दिग्दर्शक –

महेश मांजरेकर हे मराठी सिनेविश्वात आपल्या सशक्त दिग्दर्शनासाठी ओळखले जातात. “मी शिवाजीराजे भोसले बोलतोय…” या सिनेमातून त्यांनी मुंबईतील मराठी माणसाच्या अस्मितेचा प्रश्न अधोरेखित केला होता. त्यांच्या दृष्टीने ही चिंता नव्याने आलेली नसून ती दीर्घकाळ टिकून आहे. या पार्श्वभूमीवर, मराठी समाजाच्या वाट्याला येणाऱ्या जागेच्या, शिक्षणाच्या आणि सांस्कृतिक प्रतिनिधीत्वाच्या प्रश्नांवर नव्याने विचार होण्याची गरज निर्माण झाली आहे. राजकीय क्षेत्रात या मुद्द्यावर विविध पक्षांचे परस्परविरोधी मतप्रवाह असले, तरी सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांची ही खंत लक्ष वेधून घेणारी आहे.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News