दिवाळीला चित्रपटांचा धमाका ; ‘हे’ चित्रपट होणार प्रदर्शित, प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणी

Rohit Shinde

यंदाची दिवाळी केवळ पारंपरिक दिवे, फटाके आणि गोडधोडापुरती मर्यादित राहणार नाही, तर थिएटरमध्येही जबरदस्त धुमाकूळ घालणार आहे. कारण यावेळी बॉक्स ऑफिसवर एकाच आठवड्यात चार मोठ्या आणि बहुप्रतिक्षित चित्रपटांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. यामध्ये बॉलिवूड आणि टॉलीवुड अशा दोन्ही इंडस्ट्रीजमधील चित्रपटांचा समावेश आहे, जे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

दिवाळीमध्ये कोणते चित्रपट पडद्यावर?

या स्पर्धेची सुरुवात होते बॉलिवूडमधील गुणी अभिनेता आयुष्मान खुराना यांच्या आगामी चित्रपट ‘थामा’पासून. या सिनेमात आयुष्मानसोबत साऊथची लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना पहिल्यांदाच झळकणार आहे. ‘थामा’ हा दिनेश विजानच्या हॉरर-कॉमेडी युनिव्हर्सचा भाग असून, यात वॅम्पायरची थरारक आणि मजेशीर गोष्ट सादर केली जाणार आहे. यामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी यांचाही महत्त्वाचा रोल असणार आहे. हा सिनेमा थेट दिवाळीच्या मुख्य दिवशी म्हणजेच २१ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रदर्शित होतो आहे.

‘थामा’ला थेट टक्कर देण्यासाठी त्या दिवशीच प्रदर्शित होतोय हर्षवर्धन राणेचा रोमँटिक ड्रामा ‘एक दीवाने की दीवानियत’. या चित्रपटातील टायटल ट्रॅक आधीच प्रेक्षकांच्या मनात घर करून बसला आहे. या सिनेमात हर्षवर्धनसोबत पंजाबी अभिनेत्री सोनम बाजवा स्क्रीन शेअर करत असून, त्यांच्या केमिस्ट्रीचं सोशल मीडियावर भरभरून कौतुक होत आहे. हा चित्रपट रोमँटिक चित्रपटांचे चाहते असलेल्यांसाठी पर्वणी ठरणार आहे.

दिवाळीच्या आठवड्यातच दोन तमिळ चित्रपट सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यापैकी पहिला म्हणजे ‘डूड’ एक हलकीफुलकी, पण टॉलीवुडमध्ये मोठी चर्चा असलेली फिल्म. या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे कीरतीस्वरन यांनी, आणि प्रमुख भूमिकेत आहेत ममिता बैजू व प्रदीप रंगनाथन. ‘डूड’ १७ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे आणि याच्या प्रोमोमुळे सध्या तमिळ प्रेक्षकांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे.

दुसरा तमिळ सिनेमा म्हणजे ‘बाइसन’ एक दमदार स्पोर्ट्स ड्रामा. ध्रुव विक्रम आणि अनुपमा परमेश्वरन या दोन आघाडीच्या कलाकारांची प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा खेळ आणि थरार यांची सांगड घालतो. हा चित्रपटसुद्धा १७ ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये झळकणार आहे.

दिवाळीत सिनेमा रसिकांसाठी मोठी पर्वणी

एकाच आठवड्यात चार वेगवेगळ्या शैलीचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याने, बॉक्स ऑफिसवर कमाईच्या शर्यतीत कोण बाजी मारेल हे पाहणे खूपच उत्सुकतेचे ठरणार आहे. हॉरर-कॉमेडीपासून ते रोमँटिक ड्रामा आणि स्पोर्ट्स अ‍ॅक्शनपर्यंत प्रत्येक रसिक प्रेक्षकाला यंदाच्या दिवाळीत भरपूर पर्याय उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांची पसंती कुणाला मिळते आणि कोणता चित्रपट सर्वाधिक गल्ला जमवतो, हे लवकरच स्पष्ट होईल.

रिलीजच्या तारखा लक्षात ठेवा

  • ‘थामा’ आणि ‘एक दीवाने की दीवानियत’ – २१ ऑक्टोबर २०२५
  •  ‘डूड’ आणि ‘बाइसन’ – १७ ऑक्टोबर २०२५

 

ताज्या बातम्या