दिवाळीदरम्यान राजधानी दिल्लीतील वायुप्रदूषणाने चिंताजनक पातळी गाठली असून, AQI (एअर क्वालिटी इंडेक्स) मंगळवारी सकाळी 447 च्या भयावह पातळीवर पोहोचला. या गंभीर हवामान स्थितीमुळे अनेक सेलिब्रिटींनी आपली नाराजी आणि चिंता व्यक्त केली आहे. बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरची पत्नी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर मीरा राजपूत तसेच अभिनेत्री वाणी कपूर यांनी यासंदर्भात आपली स्पष्ट भूमिका सोशल मीडियावर मांडली आहे.
मीरा ची इंस्टाग्राम पोस्ट
मीरा राजपूत यांनी मंगळवारी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक परखड पोस्ट शेअर केली. त्यांनी लिहिले “आपण अजूनही फटाके का फोडतो आहोत? हे योग्य नाही अगदी जर तो ‘फक्त एकदा मुलांना दाखवण्यासाठी’ असला तरीसुद्धा. त्यांनी पुढे लिहिलं, “केवळ ‘दादाजींसाठी फुलझडी’ किंवा एखाद्या सौंदर्यात्मक अनुभवासाठीही हे योग्य नाही. आपण हे ‘नॉर्मल’ मानणं थांबवलं पाहिजे. आपण जर याला सामान्य समजू लागलो, तर आपली मुलंही त्याचं अनुकरण करतील आणि हा दुष्चक्र थांबणार नाही.”

मीरा यांनी पुढे म्हटलं की, “फक्त Earth Day साठी मुलांकडून पोस्टर बनवून, दिवाळीला ते विसरणं हा दुटप्पीपणा आहे. AQI ही फक्त तुमच्या पुढच्या इन्स्टाग्राम स्टोरीची बातमी नाही. ती आपल्या मुलांच्या श्वासातली हवा आहे. त्या म्हणाल्या की, “ही अशी परंपरा नाही ज्यात मी सहभागी होऊ इच्छिते. दुर्दैवाने, विशेषाधिकार, शिक्षण, जागरूकता आणि संपन्नता असूनही, सामान्य ज्ञानाचा अभाव दिसून येतो. त्यामुळे, जोपर्यंत तुम्ही फटाक्यांचा आनंद घेत आहात, तोपर्यंत मी माझ्या मुलांना तुमच्याकडे पाहायला पाठवणार नाही. कृपया थांबा.”
वाणी कपूरचंही प्रदूषणावर भाष्य
अभिनेत्री वाणी कपूर हिनंही आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे दिल्लीतील वाढत्या प्रदूषणावर चिंता व्यक्त केली. तिनं लिहिलं “सकाळी जाग येताच AQI 447 पर्यंत पोहोचलेला पाहिला, जो आज जगातील सर्वात जास्त आहे. कदाचित पुढच्यावर्षी आपण अशा प्रकारे साजरा करता येईल ज्यात आपली श्वसनयोग्य हवा खराब होणार नाही.
दरम्यान, दिल्लीतील वायुप्रदूषणाचा स्तर दिवसेंदिवस वाढत असून, त्याचे गंभीर परिणाम दिसू लागले आहेत. सेलिब्रिटींनीही यावर आता खुलेपणाने आवाज उठवायला सुरुवात केली आहे. प्रदूषणविरहित सण साजरे करण्याची गरज आता अधिक तीव्रतेने जाणवत आहे.