“मला आता निवृत्ती हवी आहे. मी नाटक, सिनेमातून ९९ टक्के निवृत्त होत आहे.” अशा थेट आणि भावूक शब्दांत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्या कलाविश्वातील प्रवासाचा शेवट जवळ असल्याचे संकेत दिले (Nana Patekar Retirement) . पुण्यात रविवारी पार पडलेल्या ‘नाम फाउंडेशन’च्या दशकपूर्ती सोहळ्यात त्यांनी हे महत्त्वाचं वक्तव्य केलं.
या कार्यक्रमात नाना पाटेकरांनी उपस्थितांशी संवाद साधताना आपल्या मनातील विचार मोकळेपणाने मांडले. ते म्हणाले की, “मी एक जानेवारीला पंचाहत्तरी गाठणार आहे. आता मला माझ्या मनासारखं जगायचं आहे. लोकांच्या समस्या समजून घ्यायच्या आहेत. गावखेड्यांमध्ये राहून तिथल्या लोकांसाठी काही तरी करायचं आहे. त्यामुळे मी सिनेमा आणि नाटकांमधून जवळपास पूर्णपणे निवृत्त होण्याचा निर्णय घेत आहे.”

मकरंद आता तू लक्ष दे
‘नाम फाउंडेशन’च्या पुढील कार्यवाहीलाही त्यांनी नव्या दिशेने मार्गदर्शन करत पुढचं नेतृत्व मकरंद अनासपुरे यांच्याकडे सुपूर्त केलं. “मकरंद, तू आता नामच्या कामात लक्ष दे. मी बाजूला होतोय, पण मी कान धरायला आणि पाठीवर थाप द्यायला कायमसोबत असेन,” अशा शब्दांत त्यांनी मकरंदवर विश्वास व्यक्त केला.
नानांनी ‘नाम फाउंडेशन’च्या कार्याची प्रशंसा करताना सांगितलं की, “आजवर खूप काम केलं आहे. त्यामध्ये आता खूप मोठी व्याप्ती आली आहे. पुढची पिढी आता हे काम पुढे नेत आहे, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. मी असेन, तरच काम करीन, ही भूमिका योग्य नाही. संस्थेच्या कामासाठी व्यक्तीपेक्षा विचार महत्त्वाचा असतो. ‘नाम’सारख्या शंभर संस्था निर्माण झाल्या तरीही समाजातील सगळ्या समस्या सुटणार नाहीत, पण त्यांच्यावर काम करणं गरजेचं आहे.”
पुढच्या वाटचाली बद्दल संकेत – Nana Patekar Retirement
या कार्यक्रमादरम्यान नानांनी त्यांच्या पुढील वाटचालीबद्दल देखील स्पष्ट संकेत दिले. कलाक्षेत्रात मोठ्या योगदानानंतर त्यांनी समाजासाठी काम करण्याच्या दिशेने पावलं उचलण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये आश्चर्य आणि आदराचं वातावरण निर्माण झालं आहे. नाटक आणि सिनेमा यामधून जवळपास पूर्ण निवृत्तीची घोषणा करून नाना पाटेकरांनी त्यांच्या आयुष्यातील नवीन पर्वाची सुरुवात केल्याचं स्पष्ट केलं आहे. सामाजिक बांधिलकी आणि ग्रामीण भागातील लोकांसाठी काही तरी करण्याच्या इच्छेने त्यांनी ही निवृत्ती स्वीकारल्याचं त्यांच्या बोलण्यातून दिसून आलं.











