मराठी मनोरंजनविश्वात सध्या एकच चर्चा रंगली आहे पूजा बिरारी आणि सोहम बांदेकर (Pooja Birari Soham Bandekar) यांच्या नात्याची! महाराष्ट्राच्या लाडक्या ‘भाऊजी’ आदेश बांदेकर यांच्या घरात लवकरच सनईचौघडे वाजणार असल्याचं सांगितलं जातंय. आदेश आणि सुचित्रा बांदेकरांचा एकुलता एक मुलगा सोहम बांदेकर आणि टेलिव्हिजन अभिनेत्री पूजा बिरारी हे लवकरच विवाहबंधनात अडकणार, अशी जोरदार चर्चा सध्या सर्वत्र पाहायला मिळतेय.
गेल्या काही दिवसांत पूजा बिरारीने बांदेकर कुटुंबीयांच्या घरच्या गणपती आरतीत सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर पूजा आणि सोहम यांच्या वावरातील जवळीक, सोशल मीडियावरील एकत्र फोटो आणि त्यांच्या एक्सप्रेशन्समधून हे नातं केवळ अफवाच नाही, असा अंदाज बळावत आहे. या सगळ्यावर अद्याप दोन्ही कुटुंबांकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नसला, तरी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पूजा बिरारीचं उत्तर मात्र काहीसं बोलकं ठरलं आहे.

लाजलेली पूजा, आणि नात्याबाबतचं गूढ उत्तर – Pooja Birari Soham Bandekar
राजश्री मराठी या माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत जेव्हा पूजाला तिच्या खऱ्या आयुष्यातील ‘राया’बद्दल विचारण्यात आलं, तेव्हा ती प्रचंड लाजली आणि काही वेळ फक्त हसत राहिली. तिच्या या हसण्यातच बरंच काही दडलेलं असल्याचं प्रेक्षकांना जाणवलं. पूजा म्हणाली, “नाही… मला यावर काही नाही म्हणायचं. इतक्यात तरी काही नाही बोलायचं यावर. तिच्या या उत्तरावरून चाहत्यांमध्ये उत्सुकता आणखीनच वाढली आहे. डेटिंगच्या चर्चांबाबत विचारल्यावर तर ती म्हणाली, “मी काय बोलू आणि काय नको असं होतंय…” आणि तिच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हसू आणि लाज मिश्रीत झालेली भावना स्पष्ट दिसून आली.
पूजा बिरारी: छोट्या पडद्यावरची दमदार अभिनेत्री
पूजा बिरारी हिने ‘साजणा’ या मालिकेद्वारे टेलिव्हिजन विश्वात पदार्पण केलं. मात्र, खरी ओळख तिला ‘स्वाभिमान: शोध अस्तित्वाचा’ या मालिकेने दिली. सध्या ती ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत झळकत असून, अभिनेता विशाल निकम सोबत तिची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावतेय. सोशल मीडियावर तिचं जबरदस्त फॅन फॉलोइंग असून, तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहते उत्साहाने प्रतिक्रिया देताना दिसतात.
आता लक्ष्य अधिकृत घोषणेकडे
पूजा बिरारी आणि सोहम बांदेकर यांच्या नात्याबाबत सध्या कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली, तरीही दोघांचे एकत्रित वावर, पूजा बिरारीची लाज आणि हसतमुख प्रतिक्रिया पाहता, हे नातं आता लवकरच सगळ्यांसमोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता सर्वांचं लक्ष लागलंय ते फक्त एकाच गोष्टीकडे बांदेकर कुटुंबाकडून आणि पूजाच्या कडून येणाऱ्या अधिकृत ‘साखरपुड्याच्या’ बातमीकडे!