लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचं कॅन्सरने निधन; वयाच्या 38 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन झाले. 31 ऑगस्ट रोजी ऐन गणेशोत्सवाच्या धामधुमीत अभिनेत्रीचे निधन झाल्याने मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन झाले. 31 ऑगस्ट रोजी ऐन गणेशोत्सवाच्या धामधुमीत हे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. वयाच्या 38 व्या वर्षी अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला. अशी माहिती समोर आली आहे की, कर्करोगाशी झुंज अपयशी ठरल्याने रविवारी सकाळी अभिनेत्रीची प्राणज्योत मालवली.

कॅन्सरशी झुंज अपयशी

गेल्या वर्षभरापासून प्रिया लाइमलाइटपासून दूरच होती. सोशल मीडियावरही ती सक्रिय नव्हती. अचानक तिच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. प्रिया शेवटची ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. परंतु ही मालिकासुद्धा तिने मधेच सोडली होती. सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत तिने याबद्दलची माहिती चाहत्यांना दिली होती. त्यात तिने आरोग्याचं कारण दिलं होतं.

प्रियाने ‘या सुखांनो या’ या मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने अनेक मराठी मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारल्या होत्या. ‘चार दिवस सासूचे’मध्येही ती झळकली होती. त्यानंतर ‘कसम से’ या मालिकेतून तिने हिंदी टेलिव्हिजन क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. ‘पवित्र रिश्ता’ या लोकप्रिय मालिकेत तिने वर्षाची भूमिका साकारली होती. ‘बडे अच्छे लगते है’ या गाजलेल्या मालिकेत ती ज्योती मल्होत्राच्या भूमिकेत होती. प्रिया मराठेनं 24 एप्रिल 2012 रोजी अभिनेता शंतनू मोघेशी लग्न केलं होतं.

कोण आहे प्रिया मराठे? 

प्रिया मराठे हिने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. याशिवाय अनेक हिंदी मालिकांमध्येही तिने भूमिका साकारल्या आहेत. हिंदीतील प्रसिद्ध मालिका पवित्र रिश्ता यातील कामामुळे ती घराघरांमध्ये पोहोचली होती. 2012 मध्ये तिने शंतनु मोघे या अभिनेत्यासोबत लग्न केलं होतं. प्रिया मराठे हिचा पती शंतनु मोघे याने स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. मराठी अभिनय क्षेत्रातील एक सुंदर जोडपं म्हणूनही यांच्याकडे पाहिलं जात होतं.


About Author

Rohit Shinde

Other Latest News