वाढदिवसानिमित्त प्रभासकडून नवीन चित्रपटाची घोषणा

Asavari Khedekar Burumbadkar

साय-फाय अॅक्शन थ्रिलर ‘कल्कि 2898 ए.डी.’ नंतर साऊथचा सुपरस्टार प्रभास काही काळ मोठ्या पडद्यावरून दूर होता. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘कन्नप्पा’ चित्रपटात त्यांनी छोट्या पण प्रभावी कॅमियो भूमिकेद्वारे चाहत्यांची मने जिंकली. मात्र, प्रभासला पुन्हा लीड रोलमध्ये पाहण्यासाठी त्यांचे चाहते अधीर झाले होते. अखेर त्यांच्या प्रतीक्षेला आता पूर्णविराम मिळाला आहे, कारण प्रभासच्या पुढील भव्य चित्रपटाची घोषणा झाली आहे, तीही त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने.

काय आहे चित्रपटाचे नाव?

23 ऑक्टोबर 2025 रोजी प्रभासच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून, या चित्रपटाचं शीर्षक आहे ‘फौजी’. पोस्टरसोबत मेकर्सनी एक अर्थपूर्ण कॅप्शन शेअर केलं आहे. “प्रभास हनु एक फौजीच्या भूमिकेत आहे. आपल्या इतिहासातील एका लपलेल्या अध्यायातून एका सैनिकाची सर्वात शूर कथा उलगडणार आहे. हॅपी बर्थडे रीबेल स्टार.” या पोस्टरमध्ये प्रभास अतिशय इंटेन्स लूकमध्ये दिसत असून, त्यांच्या चेहऱ्यावरची गंभीरता आणि डोळ्यांतील निर्धार पाहून प्रेक्षक भारावून गेले आहेत.

काय असेल स्टोरी

‘फौजी’च्या पोस्टरवर लिहिलं आहे की, “एक बटालियन, ज्याने एकट्यानं लढाई लढली.” यासोबत ‘ऑपरेशन Z’ असा उल्लेख दिसतो, ज्यावरून अंदाज वर्तवला जातो की चित्रपटाचं पार्श्वभूमी दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील आहे. काही सिनेमाविशारदांचं म्हणणं आहे की ‘ऑपरेशन Z’ हे जपानच्या ऐतिहासिक बॉम्बर प्रोजेक्टशी संबंधित असू शकतं, ज्याचं स्वरूप नाझी जर्मनीच्या अमेरिकाबॉम्बर योजनेसारखं होतं. त्यामुळे ‘फौजी’ हा केवळ एक युद्धपट नसून, इतिहासातील अज्ञात पण प्रेरणादायी सैनिकाच्या शौर्यकथेला उजाळा देणारा सिनेमा ठरण्याची शक्यता आहे.

‘फौजी’ व्यतिरिक्त प्रभास सध्या अनेक मोठ्या प्रोजेक्ट्सवर काम करत आहेत. त्यात संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘स्पिरिट’, ‘कल्कि 2898 ए.डी.’चा पुढील भाग, ‘सालार पार्ट 2’ आणि ‘द राजा साब’ या चित्रपटांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, ‘द राजा साब’ हा त्यांचा पुढचा मोठा रिलीज असणार असून तो 9 जानेवारी 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘फौजी’च्या पोस्टर रिलीजनंतर सोशल मीडियावर प्रभासच्या चाहत्यांमध्ये जबरदस्त उत्साह पाहायला मिळतोय. “हा प्रभास पुन्हा इतिहास घडवणार!” अशा प्रतिक्रिया चाहत्यांकडून उमटत आहेत. प्रभासचा हा फौजी अवतार केवळ देशभक्ती आणि शौर्याची कहाणी सांगणार नाही, तर त्यांच्या अभिनय कारकिर्दीतला एक नवा टप्पा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अभिनय, दमदार कथा आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीचा संगम असलेला ‘फौजी’ हा चित्रपट नक्कीच 2026 मधील सर्वात मोठ्या सिनेमॅटिक इव्हेंट्सपैकी एक ठरणार आहे.

ताज्या बातम्या