‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपटावरून वाद; महेश मांजरेकरांनी म्हटले की….

Asavari Khedekar Burumbadkar

महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या आगामी मराठी चित्रपटाभोवती सध्या वादाचे वळण घेतले जात आहे. एका निर्मिती संस्थेने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमुळे हा चित्रपट प्रकाशझोतात आला असून, कथित बौद्धिक संपदा उल्लंघन आणि जनतेची दिशाभूल केल्याचे आरोप करण्यात आले आहेत.या आरोपांवर दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी मौन सोडत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत सांगितले की, “हा चित्रपट कोणत्याही आधीच्या सिनेमाशी संबंधित नाही. तो ना सिक्वेल आहे, ना प्रीक्वेल  ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ ही एक स्वतंत्र, मौलिक आणि आमच्या श्रद्धेतून साकारलेली कलाकृती आहे.”

शिवाजी महाराज आमचे प्रेरणास्थान

मांजरेकर पुढे म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व नाहीत, ते आमचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या पराक्रमाची आणि मूल्यांची गाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. चित्रपटामागे कोणतीही दिशाभूल करण्याची निती नाही. चित्रपटात शिवाजी महाराजांच्या पुनरागमनाची कल्पना मांडण्यात आली असून, ती महाराष्ट्रातील असंख्य लोकांच्या अंतःकरणातील भावना असल्याचे मांजरेकरांनी नमूद केले. “शिवाजी महाराज १६८० नंतर पुन्हा आपल्या भूमीत अवतरतात  ही केवळ कल्पना नाही, ती आमच्या मनातील ज्वाला आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

आम्ही कुणाच्याही हक्काचा भंग केलेला नाही

विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “कथानक, पात्रं आणि चित्रपटाची मांडणी पूर्णपणे मौलिक आहे. आम्ही कुणाच्याही हक्काचा भंग केलेला नाही आणि तो होणारही नाही. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच निर्माण झालेल्या या वादामुळे प्रेक्षकांमध्ये कुतूहल आणि उत्सुकता दोन्ही निर्माण झाली आहे. मात्र महेश मांजरेकरांची स्पष्ट भूमिका आणि चित्रपटाच्या आशयाबाबतची सादर केलेली माहिती पाहता, ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट केवळ ऐतिहासिक कथा सांगणारा नसून, तो महाराष्ट्राच्या अस्मितेशी जोडलेला एक भावनिक प्रयत्न असल्याचे स्पष्ट होते.

ताज्या बातम्या