Punha Shivajiraje Bhosale Movie : पुन्हा शिवाजीराजे भोसले’मध्ये प्रसिद्ध अभिनेत्याचा रौद्र अवतार! नव्या लूकने प्रेक्षकांत उत्सुकता शिगेला

Asavari Khedekar Burumbadkar

मराठी सिनेसृष्टीत सदैव नव्या विषयांनी आणि दमदार अभिनयाने ओळख निर्माण करणारे दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर पुन्हा एकदा ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित चित्रपट घेऊन येत आहेत  ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ (Punha Shivajiraje Bhosale Movie) . या चित्रपटाची चर्चा काही महिन्यांपासूनच रंगात आहे, मात्र नुकताच प्रदर्शित झालेला सिद्धार्थ जाधवचा नवा लूक पोस्टर या चर्चेला अक्षरशः वेग देऊन गेला आहे.

चेहऱ्यावर रक्ताचे ठसे, खोल व्रण – Punha Shivajiraje Bhosale Movie

सिद्धार्थ जाधवच्या वाढदिवसानिमित्त निर्मात्यांनी त्याचा चित्रपटातील लूक उलगडला आणि सोशल मीडियावर काही क्षणांतच तो व्हायरल झाला. चेहऱ्यावर रक्ताचे ठसे, खोल व्रण, ताठ उभ्या भुवया आणि नजरेतून झळकणारा दरारा या सर्वांमुळे सिद्धार्थचा हा अवतार प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणणारा ठरत आहे. प्रेक्षकांना आतापर्यंत विनोदी आणि सकारात्मक भूमिकांमधून हसवणारा सिद्धार्थ या चित्रपटात अगदी वेगळ्या आणि रौद्र रूपात दिसणार असल्याची झलक या पोस्टरमधून मिळते.

काय म्हणाला सिद्धार्थ?

याबाबत सिद्धार्थ म्हणतो, ही भूमिका माझ्या अभिनय प्रवासातील सगळ्यात वेगळी आणि आव्हानात्मक आहे. या पात्रातील क्रौर्य फक्त अभिनयातूनच नव्हे, तर लूकमधूनही जाणवायला हवं होतं. महेश सरांनी मला फक्त माझा फोटो पाठवायला सांगितला आणि काही दिवसांत त्यांनी हा अप्रतिम लूक तयार करून दाखवला. जेव्हा मी पहिल्यांदा स्वतःला या रूपात पाहिलं, तेव्हा मीच दचकलो. मला विश्वासच बसत नव्हता की मी असाही दिसू शकतो. प्रेक्षकांनीही मला या नव्या रूपात नक्कीच स्वीकारावं, हीच अपेक्षा आहे.

कोण कोण मुख्य भूमिकेत? Punha Shivajiraje Bhosale Movie

चित्रपटाबद्दल (Punha Shivajiraje Bhosale Movie) बोलायचं झालं तर, सिद्धार्थ बोडके यात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहेत. त्यांच्यासोबत विक्रम गायकवाड, शशांक शेंडे, मंगेश देसाई, पृथ्वीक प्रताप, रोहित माने, नित्यश्री ज्ञानलक्ष्मी, सयाजी शिंदे आणि स्वतः सिद्धार्थ जाधव असे अनेक दमदार कलाकार चित्रपटात झळकणार आहेत. विशेष म्हणजे, राष्ट्रीय पुरस्कार विजेते बालकलाकार त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ची कथा आणि पटकथा महेश मांजरेकर यांनी स्वतः लिहिली असून संवादलेखन सिद्धार्थ साळवी यांनी केले आहे. राहुल पुराणिक आणि राहुल सुगंध या निर्मात्यांच्या मार्गदर्शनाखाली द ग्रेट मराठा एंटरटेनमेंट, सत्य-सई फिल्म्स आणि क्रिझोल्ह यांच्या बॅनरखाली हा चित्रपट साकारला जात आहे.

झी स्टुडिओजच्या माध्यमातून हा चित्रपट 31 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून, ऐतिहासिक घटना आणि प्रखर भावनांचा संगम असलेला हा चित्रपट मराठी प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव ठरणार आहे. सध्या सिद्धार्थचा रौद्र लूक सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. चाहत्यांनी त्याच्या या नव्या रूपाचं कौतुक करत, “हा सिद्धार्थ आम्ही आधी पाहिलाच नाही!” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. महेश मांजरेकरांच्या दिग्दर्शनाखाली ऐतिहासिक व्यक्तिरेखा, भावनिक कथा आणि ताकदीचा अभिनय यांचा संगम असलेला ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट मराठी सिनेसृष्टीसाठी निश्चितच एक मोठी पर्वणी ठरण्याची चिन्हं आहेत.

ताज्या बातम्या