बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचे पती उद्योजक राज कुंद्रा (Raj Kundra) यांच्याविरोधात ६० कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात चौकशी सुरू आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) याप्रकरणी राज कुंद्राला समन्स पाठवले होते आणि त्यांची चौकशीही केली गेली आहे. आता पुढील आठवड्यात त्यांना पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आर्थिक गुन्हे शाखेने याबाबत अधिकृत निवेदन देत म्हटलं की “शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या विरोधात ६० कोटी रुपयांच्या कथित फसवणूक प्रकरणात तपास सुरू आहे. त्यांच्याकडून आधीच जबाब नोंदवण्यात आले आहेत. त्यांना पुढील आठवड्यात पुन्हा चौकशीसाठी बोलावले जाईल.”

फसवणुकीचा आरोप- Raj Kundra
उद्योजक दीपक कोठारी यांनी दोघांवर गंभीर आरोप करत सांगितले की, त्यांनी २०१५ ते २०२३ या काळात राज कुंद्राला व्यवसाय विस्ताराच्या नावाखाली पैसे दिले. मात्र, नंतर समजले की हे पैसे व्यवसायात न वापरता त्यांच्या खाजगी खर्चासाठी वापरले गेले. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.
शिल्पा शेट्टीच्या ‘बॅस्टियन’ रेस्टॉरंटबाबत चर्चा
दरम्यान, शिल्पा शेट्टीच्या बांद्रा येथील ‘बॅस्टियन’ रेस्टॉरंटबाबतही अफवा पसरल्या होत्या की ते लवकरच बंद होणार आहे. मात्र, शिल्पा शेट्टीने यावर स्पष्टीकरण देत सांगितले की, “बॅस्टियन बंद होत नाहीये. मला अनेक कॉल्स आले, पण ह्या सगळ्या अफवा आहेत.”
नवीन रेस्टॉरंट्सची घोषणा
शिल्पा शेट्टीने यावेळी नव्या रेस्टॉरंट्सची घोषणाही केली. त्या म्हणाल्या, “‘अम्माकाई’ हे आमचं नवीन रेस्टॉरंट शुद्ध दक्षिण भारतीय, विशेषतः मैंगलोरियन पदार्थ देणार आहे, तर ‘बॅस्टियन बीच क्लब’ जुहूमध्ये सुरू होणार आहे. आमचा उद्देश म्हणजे ग्राहकांना नवे स्वाद आणि अनुभव देणे.
एका बाजूला फसवणुकीच्या आरोपांमुळे कुंद्रा दांपत्य अडचणीत सापडले असतानाच, दुसरीकडे शिल्पा शेट्टी व्यावसायिक पातळीवर नव्या संधी शोधताना दिसत आहेत. तपास कशा वळणावर जातो आणि त्याचे परिणाम काय होतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.











