Rhea Chakraborty Clean Chit : सुशांत सिंह राजपूत प्रकरणात नवा ट्वीस्ट; रिया चक्रवर्तीला क्लीन चिट

Asavari Khedekar Burumbadkar

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात नवा ट्वीस्ट आला आहे. या प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीला केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (CBI) क्लीन चिट (Rhea Chakraborty Clean Chit) दिली असून, सुशांतच्या कुटुंबाने या निर्णयाविरोधात कोर्टात लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. कुटुंबाने सीबीआयची क्लोजर रिपोर्ट “अपूर्ण आणि वरवरची” असल्याचं म्हटलं आहे आणि ती न्यायालयात आव्हान देण्याची तयारी केली आहे.

नेमकं काय घडलं? Rhea Chakraborty Clean Chit

सुशांतच्या कुटुंबाचे वकील वरुण सिंह यांनी म्हटलं आहे की, सीबीआयने चौकशीत अनेक महत्त्वाचे पुरावे दुर्लक्षित केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, जर सीबीआयला खरं सत्य दाखवायचं असतं, तर त्यांनी चॅट रेकॉर्ड, साक्षीदारांचे निवेदन, बँक व्यवहार आणि वैद्यकीय अहवाल न्यायालयात सादर करायला हवे होते. त्यांनी आरोप केला की ही चौकशी केवळ औपचारिकता होती आणि कुटुंब या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार आहे.Rhea Chakraborty Clean Chit

सीबीआयने मार्च महिन्यात पटना येथील न्यायालयात सुशांतच्या मृत्यू प्रकरणात क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. या अहवालात रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाला निर्दोष ठरवण्यात आले आहे. तपासात असे नमूद केले आहे की, सुशांत सिंह राजपूत यांनी आत्महत्या केली होती आणि या प्रकरणात रिया चक्रवर्ती किंवा इतर कोणत्याही आरोपीविरुद्ध ठोस पुरावे मिळाले नाहीत. तसेच रियाने सुशांतचे पैसे किंवा मालमत्ता गैरवापर केल्याचा कोणताही पुरावा सापडला नाही. उलट, सुशांत स्वतः तिला आपले कुटुंब मानत होते.

त्यावेळी रिया सुशांत सोबत नव्हतीच

सीबीआयच्या अहवालानुसार, 8 जून ते 14 जून 2020 या कालावधीत रिया किंवा तिचा भाऊ शोविक सुशांतसोबत नव्हते. 14 जून रोजी सुशांतचा मृतदेह त्यांच्या बांद्रा येथील फ्लॅटमध्ये आढळला होता. तपासात हेही समोर आलं आहे की या काळात सुशांतने रियाशी कोणताही संपर्क साधला नव्हता. सुशांतने 10 जून रोजी शोविकशी व्हॉट्सअ‍ॅपवर थोडक्यात संवाद साधला होता, परंतु त्यानंतर कोणताही संवाद झाला नव्हता.

तपासात असेही स्पष्ट झाले की, सुशांत आणि रिया फेब्रुवारी 2020 पर्यंत एकत्र राहत होते. त्यानंतर सुशांतची मॅनेजर श्रुती मोदीला पायाला दुखापत झाल्याने ती फ्लॅटवर येणं बंद झालं. 8 ते 12 जून दरम्यान सुशांतची बहीण मीतू सिंह त्याच्यासोबत होती. तपास यंत्रणेला कोणताही पुरावा मिळाला नाही की रिया किंवा तिच्या कुटुंबाने सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केलं किंवा त्याच्यावर दबाव टाकला.

वित्तीय तपासानुसार, 8 जून रोजी रियाने सुशांतचं घर सोडताना त्याने दिलेला एक अॅपल लॅपटॉप आणि घड्याळ सोबत घेतलं होतं, मात्र सुशांतच्या परवानगीशिवाय इतर कोणतीही वस्तू नेल्याचा पुरावा नाही. सुशांत आणि रिया एप्रिल 2018 पासून जून 2020 पर्यंत लिव-इन रिलेशनशिपमध्ये होते. सुशांतच्या विनंतीवरूनच त्याच्या मॅनेजरने ऑक्टोबर 2019 मध्ये दोघांसाठी युरोप ट्रिपची तिकिटं बुक केली होती. त्यामुळे रियावर झालेला खर्च फसवणूक म्हणून गणला जाऊ शकत नाही, असं सीबीआयच्या अहवालात नमूद आहे. या सर्व निष्कर्षांच्या आधारे सीबीआयने रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाला निर्दोष ठरवले आहे. मात्र सुशांतचे कुटुंब या निर्णयावर समाधानी नसून, त्यांनी सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टला कोर्टात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणावर 20 डिसेंबर रोजी पटना न्यायालयात सुनावणी होणार आहे.

ताज्या बातम्या